
जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या ‘शिवशक्ती आॅपरेशन’ मध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. लष्कराने सांगितले की, परिसरात संशयास्पद दहशतवादी हालचाली दिसून आल्या होत्या, त्यानंतर हिंदुस्थानी लष्कराकडून आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली. या दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या पथकावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या पथकाने दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.
सुरक्षा दलांनी सांगितले की, देगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने तात्काळ परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. चकमकीनंतर, परिसरात दुसरा कोणताही दहशतवादी लपून बसला नाही याची खात्री करण्यासाठी परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.