जम्मू-कश्मीरमधील पर्यटन व्यवसाय 90 टक्क्यांनी घसरला, 49 पर्यटन स्थळे बंद केल्याने अडचणी वाढल्या

kashmir-dal-lake

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटन व्यवसाय तब्बल 90 टक्क्यांनी घसरल्याचे चित्र आहे. येथील 49 पर्यटन स्थळे बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अनेक राज्यांमधून पर्यटकांचे आलेले बुकिंग्ज रद्द झाले असून व्यावसायिकांना आता दक्षिणेकडील राज्यांकडून अपेक्षा आहेत. कारण, येथील बुकिंग अद्याप रद्द झालेली नाहीत.

यंदाच्या पर्यटन हंगामात तब्बल पाच ते सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे कश्मीरच्या ट्रव्हल एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष रौफ ट्रम्बू यांनी सांगितले. खासकरून गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक मोठय़ा संख्येने बुकिंग रद्द करत आहेत. उत्तर हिंदुस्थानींकडून फारसे पर्यटन होत नाही. दक्षिण हिंदुस्थानींकडून फार कमी वेळा बुकिंग रद्द केले जाते. पर्यटनात त्यांचा वाटा 20 ते 25 टक्के आहे. त्यामुळे दक्षिणेकडील पर्यटकांकडून थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे ट्रम्बू म्हणाले.

सर्वत्र शुकशुकाट, रिसॉर्टस्ही बंद

5 एप्रिल ते 9 जूनपर्यंत हाऊसबोट्स पूर्णपणे भरलेले असायचे. परंतु, पहलगाम हल्ल्यानंतर येथील परिस्थिती बिकट आहे. सर्वत्र शुकशुकाट असून रिसॉर्टस्ही पूर्णपणे बंद आहेत. आमच्याकडे आता तीन प्रमुख पर्यटन स्थळे उरली आहेत. गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम. परंतु, एखादा पर्यटक पहलगामला गेला तर तो अरु, बैसरण किंवा बेताब खोऱयात जाऊ शकत नाही, असे तेथील पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.