कश्मीरमध्ये दोन अतिरेकी चकमकीत ठार

324

जम्मू-कश्मीरमध्ये अवंतीपुरा जिल्ह्यात त्राल भागात चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. या अतिरेक्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अवंतीपुरा जिल्ह्यात त्राल परिसरात काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने स्थानिक पोलीस, सीआरपीएफच्या मदतीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. लष्कराने घेरल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लष्करानेही गोळीला गोळीनेच उत्तर दिले.

मंगळवारी सकाळी सात वाजता जवानांनी एक अतिरेकी टिपला. त्यानंतर अकरा वाजता दुसरा अतिरेकीही चकमकीत ठार झाला. घटनास्थळावरून दोन एके-४७, एक पिस्तूल तसेच एक हातबॉम्ब जप्त करण्यात आला. चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराने किरनी ते बालाकोट सीमेवर हिंदुस्थानी चौक्यांना निशाणा बनवून तुफान गोळीबार केला. यात मेंढर सेक्टर येथे एक नागरिक जखमी झाला. गोळीबारात काही घरांची पडझड झाली. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या अनेक चौक्या नेस्तनाबूत झाल्या तर सहा जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या