जामनेर – बनावट चलनी नोटांसह एकाला अटक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता

जामनेर तालुक्यातील शहापूर येथे चलनी बनावट नोटांसह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख फारुख शेख नवाब (वय – 46, रा. शहापूर, तालुका जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

शहापूर येथे शेख फारुख शेख नवाब हा बनावट चलनी नोटा दैनंदिन व्यवहारात वापरत आहे व त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने यांनी शीतल साहेबराव पाटील (वय – 32, जामनेर, तालुका जामनेर) यांना पंटर म्हणून आरोपीकडे पाठविले. त्याच्याकडे दोन हजार रुपये देण्यात आले आणि त्यांना सदर कारवाईसाठी पंच म्हणून हजर राहण्याबाबत विनंती केली.

शहापूर येथे रोडवर एका निंबाच्या झाडाखाली पंटर आणि आरोपीत पैशांची देवाण-घेवाण झाली. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपीकडे 26 हजार 500 रुपयांच्या एकूण 53 बनावट चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. पोलिसांनी नोटा आणि आरोपीची मोटार सायकल जप्त केली.

आरोपी विरोधात जामनेर पोलिसात भादवि कलम 489 (ब)/(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर बनावट नोटा प्रकरणी कसून चौकशी करून यात सहभागी असलेल्या रॅकेट उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पंडित दामोदरे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भगवान तुकाराम पाटील यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या