पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात, जनसहयोग फाऊंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

जनसहयोग फाऊंडेशन या संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत दिवंगत पोलीस अधिकाऱयाच्या कुटुंबाला आज आर्थिक मदतीचा हात दिला. दिवंगत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांच्या पत्नीकडे संस्थेच्या वतीने एक लाखाचा धनादेश देण्यात आला. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते हा धनादेश श्रीमती मनीषा बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले (सत्र क्रमांक 110) प्रल्हाद बनसोडे यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. बनसोडे यांना दोन मुले असून एक दहावी तर दुसरा सहावी इयत्तेत शिकतो. अचानक वडिलांचे छत्र हरपल्याने त्या दोन्ही मुलांवर मोठा आघात झाला. ही बाब पोलीस अधिकाऱयांकडून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांना समजली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन फाऊंडेशनच्या वतीने प्रल्हाद बनसोडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार प्रभाकर पवार यांच्या उपस्थितीत विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते त्यांच्याच दालनात मनीषा प्रल्हाद बनसोडे यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांची दोन्ही मुले तसेच प्रल्हाद बनसोडे यांचे बॅचमेट अधिकारी सपोनि मनीषा ढेकळे, नवनाथ उघाडे, विजय ढगे, उमेश शिंदे शिवाय फाऊंडेशनचे ऍड. निखिल दिक्षित, राजू बांदेकर उपस्थित होते.

z मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण आल्यास, कोणतेही सहकार्य हवे असल्यास निःसंकोच सांगावे, असे आश्वासन देवेन भारती तसेच प्रभाकर प्रवार यांनी मनीषा बनसोडे यांना दिले. जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने यापूर्वीदेखील अनेक पोलीस कुटुंबे तसेच पोलीस पाल्यांसाठी आवश्यक असे भरीव सहकार्य करण्यात आले आहेत.