
खाण घोटाळा प्रकरणी भाजपचे माजी मंत्री आणि आमदार जी. जनार्दन रेड्डी यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली. निकालानंतर लगेचच सीबीआयने रेड्डी आणि इतरांना ताब्यात घेतले. खाणसम्राट म्हणून ओळखले जाणारे रेड्डी यांच्यासह अन्य तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. ओबुलापुरम मायनिंग कंपनीच्या (ओएमसी) माध्यमातून कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवरील बेल्लारी राखीव वन क्षेत्रातील खाण भाडेपट्टा अवैधपणे मिळविल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे. न्यायालयाने त्यांना सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावला. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुमारे 14 वर्षांनी हा निर्णय आला आहे.