आध्यात्मिक रंगात जान्हवी कपूरने साजरा केला 29 वा वाढदिवस; अनवाणी 3 हजार 550 पायऱ्या चढून घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने आपला 29 वा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने आणि आध्यात्मिक पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधून तिने शुक्रवारी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात जाऊन ईश्वराचे आशीर्वाद घेतले. जान्हवीने तिच्या या खास प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या साध्या आणि भक्तीमय लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जान्हवीने यावेळी केवळ मंदिरात हजेरी लावली नाही, तर सामान्य भक्तांप्रमाणे पायी प्रवासाचा मार्ग निवडला. तिने तिरुमला मंदिराकडे जाणाऱ्या अलिपिरी या मुख्य पादचारी मार्गाची निवड केली. कोणत्याही वाहनाचा वापर न करता जान्हवीने आपल्या काही जवळच्या मैत्रिणींसोबत सुमारे 11 किलोमीटरचे अंतर पायी कापले. विशेष म्हणजे, तिने ही संपूर्ण 3 हजार 550 पायऱ्यांची चढाई अनवाणी पायांनी पूर्ण केली. या प्रवासादरम्यान तिने धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मोक्कलमित्ता येथेही थांबून दर्शन घेतले.

मंदिरात पोहोचल्यानंतर जान्हवीने पहाटे ‘व्हीआयपी ब्रेक दर्शन’ घेतले. यावेळी तिने पारंपारिक दक्षिणात्य पोषाख परिधान केला होता. तिच्या या साध्या आणि सोबर लूकने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. जान्हवी अनेकदा महत्त्वाच्या प्रसंगी या मंदिराला भेट देत असते. नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभावी आणि आपली कारकीर्द यशस्वी व्हावी, या प्रार्थनेसाठी तिने वाढदिवशी तिरुपती बालाजी चरणी नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर तिने आपल्या सजवलेल्या बेडरूमचे फोटोही शेअर केले असून, चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.