
सलग सातव्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत नोव्हाक जोकोविचचे ग्रॅण्डस्लॅमच्या सिल्व्हर ज्युबिलीचे स्वप्न अधुरेच राहिले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने अवघ्या एक तास 55 मिनिटांत सातवेळा विम्बल्डन जिंकणाऱया नोव्हाक जोकोविचचे 6-3, 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये स्वप्न भंग करत प्रथमच विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे कार्लोस अल्कराझने विम्बल्डनच्या हिरवळीवर आपला भन्नाट खेळ कायम राखत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचे आव्हान 6-4, 5-7, 6-3, 7-6 (8-6) असे मोडीत काढत सलग तिसऱयांदा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.
आजचा दिवस नोव्हाक जोकोविचसाठी निराशेचा ठरला. आपल्या 25 व्या ग्रॅण्डस्लॅमचे स्वप्न विम्बल्डनच्या हिरवळीवर साकार करण्याचे ध्येय जोकोविचने समोर ठेवले होते, मात्र आज सिनरपुढे तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याने पहिले दोन्ही सेट सहज गमावल्यानंतर तिसऱया सेटमध्ये तीन मॅचपॉइंट वाचवत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. गेल्या सहाही विम्बल्डन स्पर्धेत तो अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र यंदा त्याचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत विक्रमी लढलेले अल्कराझ आणि सिनर हे दोन युवा दिग्गज पुन्हा एकदा जेतेपदासाठी झुंजतील.