नितीश कुमार मुख्यमंत्री होते व राहणार…जदयूने आधी केले पोस्ट नंतर केले डिलीट

बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालात भाजप व जदयू सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर असून कधी भाजप पुढे जातेय तर कधी जदयू. सध्या भाजप 92 जागांवर तर जदयू 81 जागांवर आघाडीवर आहे.

अद्याप पूर्ण निकाल हाती आलेला नसतानाच संयुक्त जनता दलाने नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. जदयूकडून नितीश कुमारांच्या फोटोसोबत न भूतो न भविष्यती.. नितीश कुमार मुख्यमंत्री होते व राहणार”, अशी कॅप्शन शेअर केली होती.

ही पोस्ट शेअर करताच जदयूने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर जदयूने काही मिनिटांतच ही पोस्ट डिलीट केली. भाजपने निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्पष्टपणे जाहीर केले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरू आतापासूनच या दोन्ही पक्षात कुरबुरी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.