
ईरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात अमेरिका, इस्रायलविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवारी जिल्ह्यातील हजारो शिया समुदायाचे लोकं रस्त्यावर उतरले. हातात खामेनीचे पोस्टर्स आणि काळे झेंडे घेऊन आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जौनपूरमधील कल्लू इमामवाडा येथे जमलेल्या जनसमुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.
या निदर्शनादरम्यान आंदोलकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता. “तुम्ही एक हुसैनी माराल, तर प्रत्येक घरातून नवा हुसैनी जन्माला येईल,” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. खामेनींचा मृत्यू झाल्याने हे आंदोलन संपणार नाही, तर ते अधिक उग्र होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. खामेनींच्या जाण्याने शिया समुदायामध्ये केवळ शोकच नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद यांनी या हल्ल्याचा ‘भ्याड दहशतवादी हल्ला’ म्हणून निषेध केला आहे. ते म्हणाले की, अयातुल्ला खामेनी यांनी नेहमीच शहादतची प्रार्थना केली होती आणि ते युद्धात लढता लढता शहीद झाले आहेत. आमच्या धर्मात शहादत हा सर्वोच्च दर्जा मानला जातो. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनींची हत्या केलेली नाही, तर स्वतःच्या ‘डेथ वॉरंट’वर स्वाक्षरी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी देशभरातील शिया समुदायाला तीन दिवसांचा शोक पाळण्याचे आवाहन केले आहे.


























































