तुझे पूर्वज इंग्रजांचे बूट चाटत होते तेव्हा… ‘पाकिस्तानी’ म्हटल्यानं जावेद अख्तर भडकले, ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

हिंदुस्थानचा 79 वा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सर्वसामान्यांसह बड्या सेलिब्रिटींनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनीही आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर एका युजरने त्यांचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडला. यामुळे जावेद अख्तर यांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी ट्रोलरला फैलावर घेतले.

जावेद अख्तर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक्सवर पोस्ट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ‘बांधवांनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हे स्वातंत्र्य आपल्या ताटात कुणी वाढून दिले नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी तुरुंगावास भोगला, फासावर गेले त्यांचे स्मरण करत त्यांना सॅल्यूट ठोकला पाहिजे. हा अनमोल खजिना आपण कधीही गमावणार नाही, असा प्रण करूया’, असे जावेद अख्तर म्हणाले.

जावेद अख्तर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र एका युजरने त्यांना थेट पाकिस्तानी म्हटले. ‘तुमचा स्वातंत्र्य दिन तर 14 ऑगस्टला आहे’, अशी कमेंट युजरने केली. ही कमेंट वाचून जावेद अख्तर यांच्या संतापाचा कडेलोट झाला.

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या युजरला जावेद अख्तर यांनी खडे बोल सुनावले. ‘बेटा, तुझे वडील-आजोबा जेव्हा इंग्रंजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत मरत होते. त्यामुळे लायकीत रहा’, असा सडेतोड उत्तर जावेद अख्तर यांनी दिले.

देशात सरकारविरोधात बोलल्यास ईडी, सीबीआय मागे लागण्याची भीती, जावेद अख्तर यांचे परखड मत