
जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडात मृतांच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत मोबाईलचे अवशेष आढळले नाही. रक्ताने माखलेले कपडे आरोपींनी रॉकेल टाकून जाळले; परंतु फॉरेन्सीक तपासणीत राखेमध्ये रॉकेलचा अंश आढळून आला नाही, याकडे आरोपींच्या वकिलांनी लक्ष वेधले.
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड खटल्यात बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू आहे. वकील सुनील मगरे, छगन गवई, नितीन मोने, सिद्धार्थ उबाळे, अरुण चांदणे हे काम पाहात आहेत.
आरोपी प्रशांत जाधव याने पोलिसांना निवेदन देऊन हत्याकांडाचे घटनास्थळ दाखविण्याचे सांगितले. त्यानुसार तपासी अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केल्याचा मुद्दा ऍड. मगरे यांनी खोडून काढला. प्रशांतने स्वच्छेने घटनास्थळ दाखविले नाही. पोलीस प्रशांतला लॉकअपमधून रात्री-अपरात्री बाहेर काढून दबाव तंत्राचा वापर करत होते. याबाबत लॉकअप रजिस्टरला नोंदी आहेत. पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करून त्याला घटनास्थळ दाखविण्यास भाग पाडले.
पाटील यांना रस्ता माहीत होता. त्यामुळे प्रशांतने घटनास्थळ दाखविले, याला काहीही महत्त्व नाही. अशोकने घटनाक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविले. हत्याकांडानंतर कपडे रॉकेल टाकून जाळून टाकण्यात आले. या जागेतून राख जप्त करण्यात आली. या राखेचे अंश पोलिसांनी फॉरेन्सीक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या राखेमध्ये रॉकेलचा अंश असल्याचा अहवाल आलेला नाही. सरकारी पक्षाच्या म्हणण्याला न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल बळकटी देत नाही, असा बचाव करण्यात आला. मयत सुनील वापरत असलेला मोबाईल प्रशांतने अंत्यसंस्काराच्या वेळेस पेटत्या चितेत टाकून नष्ट केला. पोलिसांनी ही राखही प्रयोगशाळेकडे पाठविली होती. यामध्ये मोबाईलचा अंश आढळून आलेला नाही, असा युक्तिवादही बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला.
साडीची ओळख परेड
मयत जयश्रीची साडी आरोपींनी मिरी-घोडेगाव रस्त्यावरील नाल्यात फेकून दिली. जयश्रीची आई अंजना गायकवाड यांनी ही साडी ओळख परेडमध्ये ओळखली, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. या हत्याकांडानंतर या भागात दोनदा पाऊस झालेला आहे. तहसीलदार सुभाष भाटे यांनी ओळख परेड घेताना पुरावा कायद्यातील कलम नऊची प्रक्रिया पार पाडलेली नाही, असे म्हणणे सादर केले.


























































