उमेद – आत्महत्या हा मार्ग नव्हे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयंत माईणकर

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।

भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत: ।।

त्रयोवेदस्य कर्तारौ भण्डधूर्तनिशाचरा: ।

जोवर जगताय तोवर सुखाने जगा. वेळी कर्ज करूनही तूप प्या (दूध, तूप, साखर असे सुग्रास जेवा). राख झालेल्या देहाचे पुन्हा कुठे परत येणे होणार आहे. तिन्ही वेदांचे रचयिते विदूषक, धूर्त, निशाचर, चोर आहेत! हा वरील श्लोकाचा अर्थ.

’चार्वाक दर्शना’स नावे ठेवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी सर्रास वापरला जाणारा हा कुख्यात तसेच विख्यात श्लोक आहे. भारतीय संस्कृतीतील आद्य निरीश्वरवादी, भोगवादी चार्वाक मुनींनी 2700 वर्षांपूर्वी ”कर्ज काढा, पण तूप प्या” असा भोगवादी सल्ला दिला होता. सध्याच्या मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेत तर ’कर्ज’ किंवा ’ऋण’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील विकसित देशांमध्ये आघाडीवर असलेले देशच जगातील सर्वात मोठे कर्जदार आहेत. अमेरिकेवर सध्या एकूण कर्ज 14,590 ट्रिलियन डॉलर. कर्ज त्यांना दिलं जातं ज्यांच्याकडे ते फेडण्याची क्षमता असते. ही रक्कम मदत म्हणून देण्यात येणारे सानुग्रह अनुदान नसते तर विशिष्ट मुदतीत सव्याज परतफेड केली जाणारी रक्कम असते.

रोमानिया हा जगातला एकमेव देश ज्याच्यावर निक चौसेस्क्यू या कम्युनिस्ट हुकूमशहाच्या काळात कुठलेही परकीय कर्ज शिल्लक नव्हते. एका जुलुमी राजवटीतला एकमेव आशेचा किरण म्हणून या घटनेचा उल्लेख केला जातो, पण कर्ज फेडताना त्या देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईस आली की, अखेर ाढांती होऊन चौसेस्क्यूना पदच्युत करून ठार मारण्यात आले. म्हणजे कर्ज काहीही नसणं हे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण. चार्वाकांनी  अख्खा भांडवलवाद केवळ एका ओळीत मांडला होता. ज्याचा मूलाधार होता कर्ज!

’कॅफे कॉफी डे’ या साखळी आऊटलेटचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ  यांच्यावर सात हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. सिद्धार्थ म्हणजे कोणी सामान्य असामी नव्हती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा त्यांचे सासरे तर  सध्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची मुलगी त्यांची सून. इतके राजकीय हितसंबंध असतानाही चार वर्षांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली. कारण होतं कर्ज!

’स्टार ऑफ द मिलेनियम’, सुपरस्टार  अमिताभ बच्चन यांनी 1996 साली त्यांच्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीद्वारे ’मिस वर्ल्ड’ ही सौंदर्य स्पर्धा बंगळुरू इथे घेण्याचे ठरवले. पुढे ही स्पर्धा घेतली गेली नाही, पण अमिताभ बच्चन यांच्यावर मात्र 90 कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यांच्यावर 55 केसेस दाखल करण्यात आल्या. इतरांनी थोडीफार मदत केली असेलही, पण शेवटी कर्ज फेडायला बच्चन यांना स्वत:च पुढाकार घ्यावा लागला. व्याजाच्या बदल्यात त्यांनी काही जाहिराती केल्या. आपल्या चित्रपटांचे हक्क विकले आणि यश चोप्रा यांच्याकडे  कामाची मागणी केली. यश चोप्रा यांच्या ’मोहब्बते’ चित्रपटाने अमिताभ यांच्या करीअरला नवी उभारी मिळाली. त्याच वेळी 2000 साली ’कौन बनेगा करोडपती’ या शोची सुरुवात झाली. आतापर्यंत या शोचे 23 सीझन झाले आहेत.

व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या  आत्महत्येनंतर त्यांची पत्नी मालविका यांनी ’कॅफे

कॉफी डे’चा कारभार हाती घेतला. काही आऊटलेट्स बंद केली. इतर काही निर्णय घेतले आणि आज कर्ज केवळ 465 कोटी रुपयांवर आणून ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करणारे स्व. नितीन चंद्रकांत देसाई यांचे संबंध सर्वच राजकीय पक्षांत होते. अशा देसाई यांच्यावर अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्ज देणाऱयाने परतफेडीसाठी आग्रह धरणं किंवा तगादा लावणं हे कायद्याच्या चौकटीत राहून जोपर्यंत होतं तोपर्यंत गैर नाही. कारण त्या व्यक्तीनेसुद्धा कर्ज  दिलेलं असतं.

एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी आज दिवाळखोरीत आहेत. कारण आयुष्यात असे चढउतार चालतच असतात. त्यावर आत्महत्या हा मार्ग नव्हे आणि हेच सूत्र कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करणाऱया शेतकऱयांना लागू आहे. आत्महत्या करताना होणाऱया काही मिनिटांच्या त्रासानंतर जरी ती व्यक्ती मुक्त होत असेल तरी त्याचे परिणाम जिवंत असलेल्या नातेवाईकांना भोगावे लागतात. अमिताभ बच्चन 90 कोटींच्या बोजातून बाहेर पडले. ’कॅफे

कॉफी डे’चे कर्ज आता सात हजार कोटी रुपयांवरून 465 कोटींवर आलं आहे, देसाईंच्याही बाबतीत हेच घडू शकतं, पण तेव्हा देसाई नसतील.

आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत ’कर्ज’ हा शब्द आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि ”कर्ज काढा, पण जीवन आनंदाने जगा” असा आद्य भौतिकवाद सांगणारे चार्वाक म्हणतात, देहाची राख झाल्यानंतर कुठलाही पुनर्जन्म नसतो. अर्थात  जीवन संपविण्याचा आततायी निर्णय घेण्यापेक्षा येणाऱया संकटांना तोंड द्या.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)