
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनेक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. यावेळी अवर्षणग्रस्त मराठवाड्याचा पाणीप्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी क्षीरसागर यांनी मांडल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री 8 वाजता राज्यातील काही नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. चर्चेची सुरूवात मराठवाडा आणि बीड जिल्ह्यापासून करण्यात आली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीड आणि मराठवाड्याच्या समस्या मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व करत होते. यावेळी क्षीरसागर म्हणाले की, मराठवाड्याचा पाणीप्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ओला आणि कोरडा दुष्काळ यामुळे मराठवाडा त्रस्त आहे. कोरड्या दुष्काळाने मराठवाड्याचे कंबरडे मोडले आहे. जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र निर्माण करणे मराठवाड्याच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पश्चिम वाहिनीच्या वैतरणा आणि दमणगंगासारख्या नद्यातील अतिरिक्त पाणी समुद्राकडे वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा प्रकल्प राबवता येईल. आपण त्यासाठी सतत पाठपुरावाही केला आहे या प्रकल्पाला तत्वत: मान्यताही देण्यात आली. हा प्रकल्प मराठवाड्याचे भाग्य बदलू शकतो. प्रकल्पाला अंतिम रूप देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे, ते देत असताना ओबीसी आरक्षणाला कोठेही धक्का लागू नये अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यात पिकविमा वाटपात मोठी तफावत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. वीज वितरण कंपनीकडून बीड नगर पालिकेला वेठीस धरले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास बँका प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे वेळेवर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. बीड शहरात अमृत आणि भुयारी गटार योजनेच्या मोठ्या योजना सध्या सुरू आहेत. या योजनेचा निधी वेळेवर मिळणे गरजेचा आहे. निधीअभावी कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. क्षीरसागरांच्या प्रत्येक मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.




























































