
सामना प्रतिनिधी । बीड
‘गावागावात शिवसैनिक शिवसेनेची ताकद निर्माण करत असतो. शिवसैनिकांच्या निष्ठेला तोड नाही त्याचा अनुभव मलाही आलेला आहे. आता आपण सर्व एकाच कुटुंबात आहोत. शिवसेनेच्या सीमा रुंद करायच्या आहेत’, या शब्दात जयदत्त क्षीरसागरांनी भावना व्यक्त केल्या बीडच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात पीक विमा मदत केंद्राचा शुभारंभ रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यावेळी उपस्थित होते.
क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले, ‘आता मी शिवसेना परिवारतील सदस्य आहे. मी आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहे. मंत्रीपद मला मोठे नाही आणि मंत्रिपदाचा गर्व ही नाही. ही सत्ता साध्य नाही तर साधन आहे ते जनतेचे काम करण्याचे. सध्या बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाऊस नक्की पडेल.’
‘मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ व्हावा यासाठी काम करायचे आहे. दुष्काळाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही खूप गंभीर आहेत. पश्चिम वाहिनी नदीचे पाणी जायकवाडीमध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते ही कोणताही वाद न होऊ देता. कारण कोणाच्या हक्कचे पाणी नको आहे. समुद्रात वाहून जाणारे 12 टीएमची पाणी जायकवाडीत येऊ शकते. यातून पुढची पिढी दुष्काळ मुक्त होऊ शकते. यासह सध्या विजेचा प्रश्न ,पांदण रस्ते, वैयक्तीक लाभाच्या विहिरी, यावरही प्रकर्षाने काम करायचे आहे. आपण जिद्दीने आणि पराकाष्ठे ने कामाला लागू. विधानभवनावर भगवा फडकावयाचा आहे’, असे क्षीरसागर म्हणाले.



























































