शिरोळ तालुक्याभोवती महापुराचा फास आवळला, सांगली-जयसिंगपूर संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

राधानगरी, कोयना व चांदोली धरणांतून प्रचंड प्रमाणात सोडण्यात येणारे पाणी आणि वरून पावसाच्या अखंड वर्षाव यामुळे मंगळवारी शिरोळ तालुक्याभोवतीचा महापुराचा फास आणखीनच आवळला. तालुक्यातील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याखाली असून अक्षरशः हजारो लोक विस्थापित झाले आहेत. कोल्हापूरहून सांगली हा मुख्य राज्यमार्गही पाण्याखाली गेल्याने व मिरजेपर्यंतची रेल्वे सेवाही काही दिवसांपासून बंद असल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचा अखेरचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पूरग्रस्तांना मुख्यतः जयसिंगपूर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), स्वयंसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहेत. सायंकाळी उशीरा नौदल, लष्करी जवान, वायुदल यांची पथके जिल्ह्यात दाखल झाली असून शिरोळ तालुक्यात गरजेनुसार मदतकार्य केले जाणार आहे.

गेले दोन दिवस पावसाने शिरोळ तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत अखंडपणे कोसळत होता. दुपारी तीननंतर त्याने थोडीशी विश्रांती घेतली. तालुक्यात 31.43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सातही दरवाज्यांतून 6 हजार, कोयना धरणातून 11 हजार 970 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वारणा या नद्यांची पातळी वेगाने वाढत आहे.

तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हसूर, कुटवाड, कनवाड, दानोळी, कवठेसार, चिंचवाड, उमळवाड, कोथळी आदि गावांना पुराच्या पाण्याने संपूर्णतः वेढले आहे. येथील रहिवाशांना बोटींच्या साह्याने सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जयसिंगपूर-उदगाव बायपास, सांगली-कोल्हापूर नवीन बायपास, नृसिंहवाडी-कुरुंदवाड, खिद्रापूर-इचलकरंजी, जयसिंगपूर-इचलकरंजी हे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केले गेले आहेत. रेल्वेसेवाही रुकडी स्थानकावर पाणी आल्याने ठप्प आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा सांगली जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सांगलीशी जोडणार्‍या अंकली पुलानजीक पाण्याची पातळी 52.1 फूट इतकी विक्रमी झाली आहे. तर तेरवाड बंधारा 67.3 फूट, शिरोळ बंधारा 66.7 फूट, नृसिंहवाडी येथे 66.7 फूट व राजापूर बंधारा 54.9 फूट अशी पाणीपातळी नोंदविण्यात आली आहे.

jaysingpur

पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त शुगर्स कारखान्याने पूर ओसरेपर्यंत पूरग्रस्तांसाठी राहण्याची, भोजनाची, जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था कारखाना कार्यस्थळावर केली आहे. शरद इन्स्टिट्यूटने कृष्णा नदीपलीकडील सात गावांतील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मोफत बससेवा सुरू केली आहे.

घोडावत विद्यापीठाकडून मदतीचा हात
संजय घोडावत ग्रुपतर्फे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, जनावरांना चारा, पूरग्रस्तांसाठी भोजन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या गाड्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना ने-आण करण्याच्या कामात गुंतल्या आहेत.

पालिकेची तातडीची सभा
शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुराच्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी जयसिंगपूर पालिकेची तातडीची एकदिवसीय विशेष सभा बुधवारी सकाळी 11.30 वाजता देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी बोलाविली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार आपत्ती व्यवस्थापन नियोजन करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

जयसिंगपूरला चार दिवस पाणी नाही
जयसिंगपूरला पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेलचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आजपासून 10 ऑगस्टपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, तसेच पालिकेच्या कूपनलिकांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.