
इंजिनियरींग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन परीक्षा आता एका वर्षामध्ये चार वेळा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ही घोषणा केली. जेईई परीक्षेला बसण्यास इच्छुक विद्यार्थी 15 जानेवारीपर्यंत परीक्षांसाठी अर्ज करू शकणार आहेत. एनटीएने जेईई परीक्षेच्या स्वरुपामध्येही काही बदल केले आहेत.
जेईई-मेन 2021 परीक्षेचे पहिले सत्र 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र मार्च, तिसरे एप्रिल तर चौथे सत्र मे महिन्यात होणार आहे. विविध राज्यांच्या बोर्डाच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना होत असतात. त्या परीक्षांच्या तारखा जेईईच्या तारखांबरोबर येऊ नयेत यासाठी एनटीएने हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना प्रश्न निवडण्यासाठी पर्याय
जेईईमध्ये पूर्वी जितके प्रश्न विचारले जात होते तितकेच पुढेही विचारले जाणार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांतील प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जात होते. परंतु यापुढे प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न दोन भागात दिले जाणार आहेत. पहिल्या भागात 20 तर दुसऱया भागात 10 प्रश्न असतील. दुसऱया भागातील दहा प्रश्नांपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहेत.
13 भाषांमध्ये होणार परीक्षा
जेईई परीक्षा आतापर्यंत इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये होत होती. यापुढे ती 13 भाषांमधून होईल. त्यात इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, कन्नड, मराठी, मल्याळी, उडिया, तामिळ, ऊर्दू, तेलुगू आणि पंजाबी या भाषांचा समावेश असेल.

























































