
जेईई अॅडव्हान्समधील टॉपर्स विद्यार्थ्यांनी पहिली पसंती आयआयटी मुंबई पवई कॅम्पसला दिली आहे. टॉप 500 विद्यार्थ्यांपैकी 431 विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य आयआयटी मुंबई आणि कॉम्प्युटर सायन्सला आहे, तर 36 विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्ली तर 21 विद्यार्थ्यांनी आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूरला पाच आणि प्रत्येकी तीन जणांनी आयआयटी खरगपूर आणि गुवाहाटीला पसंती दिली आहे.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेतील टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी 89 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईचा प्राधान्यक्रम भरला होता. यातील 67 जणांना प्रवेश मिळाला आहे. गेल्या वर्षी टॉप 100 विद्यार्थ्यांमधून 93 जणांनी आयआयटी मुंबईला पहिले प्राधान्य दिले होते. त्यांपैकी 69 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले होते. संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाने पहिली जागा वाटप यादी जाहीर केली. यात आयआयटी, एनआयटी आणि आयआयआयटीसाठी संयुक्त समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयआयटी-मुंबईला सर्वाधिक पसंती मिळत असली तरी सर्वाधिक अर्ज आयआयटी खरगपूरसाठी आले आहेत.
संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार एकूण 2 लाख 15 हजार 917 उमेदवारांनी संयुक्त समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. यात 1 लाख 63 हजार 744 मुले आणि 52 हजार 170 मुली आणि तीन ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. संयुक्त समुपदेशनासाठी नोंदणी केलेल्या 30 हजारांहून अधिक उमेदवारांनी आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
जेईई अॅडव्हान्स रँकर्स
टॉप 10 – आयआयटी विद्यार्थी
आयआयटी मुंबई 10
टॉप 50 – आयआयटी विद्यार्थी
आयआयटी मुंबई 47
आयआयटी दिल्ली 2
आयआयटी मद्रास 1
टॉप 100 – आयआयटी विद्यार्थी
आयआयटी मुंबई 89
आयआयटी दिल्ली 6
आयआयटी मद्रास 4
टॉप 500 – आयआयटी विद्यार्थी
आयआयटी मुंबई 431
आयआयटी दिल्ली 36
आयआयटी कानपूर 5
आयआयटी मद्रास 21
आयआयटी खरगपूर 3
आयआयटी गुवाहाटी 1
























































