बडय़ा कलाकारांचा ‘जिवलगा’ लवकरच स्टार प्रवाहवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नवनवीन मालिका आणि त्यांचं दर्जेदार सादरीकरण करणाऱया ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर असाच एक वेगळा विषय असलेली ‘जिवलगा’ लवकरच सुरू होणार आहे. आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी मालिकेत दिसणार आहेत, तर ग्लॅमरस गर्ल अमृता खानकिलकर हिची ‘जिवलगा’ मधून पहिल्यांदाच टीव्हीवर एंट्री होणार आहे. मधुरा देशपांडे हीदेखील वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ही मालिका 8 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता स्टारप्रवाहवर सुरू होईल.

‘जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…’अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी लेखन केले आहे. उमेश नामजोशी यांचे दिग्दर्शन आहे.

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पहायला मिळतील. मानवी स्वभाक आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे.

स्वप्नील जोशी पुनरागमनाबद्दल म्हणाला, ‘मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मालिका करतोय. ‘जिवलगा’मध्ये विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं, याकर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे. – स्वप्नील जोशी

वेब सीरिज असू देत, मराठी-हिंदी चित्रपट असोत किंवा रिऑलिटी शो. ‘जिवलगा’ मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जितकी मजा मला ही भूमिका साकारताना येतेय तितकीच ती तुम्हाला बघताना येईल. – अमृता खानविलकर