Champai Soren – झारखंडचं राजकारण तापलं! चंपई सोरेन यांची मोठी घोषणा, नव्या पक्षाची स्थापना करणार

गेल्या काही दिवसांपासून झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता चंपई सोरेन यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांनी नव्या पक्षाची घोषणा करत युतीचे सर्व पर्याय खुले असल्याचेही सांगितले आहे. चंपाई यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.

चंपाई यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे की, झारखंडचे आभार! प्रेम, सहकार्य आणि साथ दिल्याबाबत. गेली साडेचार दशके मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे आणि आयुष्याच्या नव्या अध्यायात तुमचा आशिर्वाद मला योग्य निर्णय घेण्याचे बळ देत आहे. सध्या मी जनतेला भेटत आहे, आता निवृत्ती नाही. आता पक्ष बळकट करणार. नवीन पक्ष काढणार. सर्वांच्या मतानुसार लवकरच निर्णय घेतला जाईल.

झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, चंपाई सोरेन यांनी नवी पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे. शिवाय युतीसाठी पर्याय खुले ठेवले आहेत. ते म्हणाले, “मी निवृत्ती, नवीन संघटना किंवा मित्र असे तीन पर्याय दिले होते. मी निवृत्त होणार नाही, मी एक पक्ष मजबूत करेन, नवीन पक्ष काढेन आणि वाटेत मला एखादा चांगला मित्र भेटला तर मी त्याच्यासोबत पुढे जाईन”.

जेव्हा चंपाई सोरेन यांना माध्यमांकडून विचारण्यात आले की, विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्याकडे नवीन पक्ष स्थापन करणे आणि तो मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. त्यावर चंपाई म्हणाले, ही तुमची अडचण नाही. जेव्हा आमच्यासोबत 30-40 हजार कार्यकर्ते येऊ शकतात तर मग नवीन पक्ष स्थापन करण्यात काय हरकत आहे. नवीन पक्ष आठवड्याभरात बनेल.

माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी ‘अपमान’ असा उल्लेख केला होता. या घोषणेपूर्वी चंपाई सोरेन यांनी JMM नेतृत्वाबाबत नाराजीचे संकेत दिले होते. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या नकळत अचानकपणे सरकारी कार्यक्रम रद्द केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर येताच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री झाले.