85 वर्षांनंतर रणजीत घडला इतिहास, झारखंडने फॉलोऑननंतर मिळवला त्रिपुरावर विजय

431

रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुरुवारी एका नव्या विक्रमाची नोंद झाली. स्पर्धेच्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवला. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्रिपुरा विरुद्ध झारखंड यांच्यातील लढतीत फॉलोऑनची नामुष्की पत्करलेल्या झारखंड संघाने दुसर्‍या डावात नेटाने फलंदाजी करीत यजमान त्रिपुरा संघावर 54 धावांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयाची तुलना टीम इंडियाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाशी केली जात आहे.

त्रिपुराने घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत 289 धावा केल्या. उत्तरादाखल झारखंड संघाचा पहिला डाव 136 धावांत गडगडला. फॉलोऑननंतर दुसर्‍या डावातदेखील झारखंडचा डाव कोसळला. इशांक जग्गी आणि सौरभ तिवारी मैदानात होते; पण जग्गी (207 चेंडूंत 107 ) आणि तिवारी (नाबाद 122 ) या जोडीने 190 चेंडूंत 122 धावांची शतकी भागीदारी रचत झारखंडला सुस्थितीत पोचवले. झारखंडने आपला दुसरा डाव 8 बाद 418 धावांवर घोषित केला. विजयासाठीचे 266 धावांचे आव्हान गाठताना यजमान त्रिपुरा संघ पार दबावात खेळला. त्यांचा दुसरा डाव 211 धावांतच गुंडाळत झारखंडने ऐतिहासिक विजय नोंदवला. झारखंडचा जलदगती गोलंदाज आशिष कुमारने पाच विकेट घेत त्रिपुराचा पराभव निश्चित केला. त्रिपुराकडून एम.बी. मुरासिंहने 103 धावांची खेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या