सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनसोबतच Jio लॅपटॉपही बाजारात आणणार

Jio Phone 5G Next Gen JioPhone Jio Laptop launch price : देशातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी Reliance Jio लवकरच बाजारात सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन उतरवणार आहे. स्मार्टफोनसोबतच आता जिओने सर्वात स्वस्त लॅपटॉपही बाजारात उतरवण्याचं निश्चित केलं आहे.

24 जूनला रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिओच्या पुढील योजना आणि या दोन उत्पादनांबाबत माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. जिओ बुक लॅपटॉप ( Jio Book Laptop ) आणि जिओ फोन 5G ( Jio Phone 5G ) अशी या उत्पादनांची नावे असणार आहेत. या दोन्ही उत्पादनांची लोकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे.

रिलायन्सने मुंबईमध्ये 5Gची चाचणी करायला सुरुवात केली आहे. रिलायन्सने नोकिया, सॅमसंग आणि एरीक्सनसोबत हातमिळवणी करत इतर शहरांमध्येही ही चाचणी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात 5Gची सेवेला सुरुवात होताच जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या ही सेवा देण्यास सुरुवात करतील.

5G सेवेचा आनंद लुटण्यासाठी 5G पूरक फोन असणंही गरजेचं आहे. साधारणपणे एका वर्षापूर्वी मोबाईल उत्पादक कंपन्यांनी 5G सेवा देऊ शकतील असे फोन विक्री करण्यास सुरुवात केली होती. ही सेवा देऊ शकतील असे चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन साधारणपणे 15 हजारापासून बाजारात मिळत आहेत. 5G सेवेसोबतच मोबाईल उत्पादक कंपन्यांनाही हादरा देण्याचा जिओनं ठरवलं आहे. यासाठी जिओ त्यांचा 5G स्मार्टफोन अवघ्या 5 हजारांना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जिओच्या गेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये गुगलच्या मदतीने देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या मोबाईल फोनच्या सध्या चाचण्या सुरु असल्याचं कळतंय. या फोनसोबतच जिओने लॅपटॉपही बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. जिओ बुकची स्क्रीन 1366×768 पिक्सेलची असेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर बसवण्यात आला आहे. 2GB और 4GB RAM सह 32 GB और 64 GB स्टोरेजचे पर्याय ग्राहकांना देण्यात येणार आहेत. या लॅपटॉपमध्ये जिओची स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. महागडे लॅपटॉप खरेदी करू न शकणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवत जिओने आपला लॅपटॉप बाजारात आणण्याचं ठरवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या