पुलवामात दहशतवाद्यांनी केली मजुराची हत्या

457
terriorist
प्रातिनिधीक फोटो

जम्मू-कश्मीरमधील पुलवामातील काकपोरा भागात दहशतवाद्यांनी वीट भट्टीत काम करणाऱ्या एका मजुराची हत्या केली आहे. सेठी कुमार सागर असे या मजुराचे नाव असून तो छत्तीसगडचा आहे. येथील नेहामा भागातील वीट भट्टीत तो मजुराचे काम करत होता. याघटनेनंतर पुलवामात खळबळ उडाली असून हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला याबद्दल मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने दहशतवादी चवताळले आहेत. येथील व्यापाऱ्यांना व्यापार बंद करण्याच्या धमक्या देण्याबरोबरच स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सोमवारीही शोपियांमध्ये ट्रकमध्ये सफरचंद भरत असताना दहशतवाद्यांनी ट्रक मालकाची हत्या केली. तर मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पुलवामा चौकाजवळ सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला. ग्रेनेड रस्त्यावर पडले पण त्याचा स्फोट झाला नाही. यामुळे सुदैवाने यात कसलेही नुकसान झाले नाही.

दरम्यान, ट्रकचालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हल्लात चार दहशतवादी सहभागी असल्याची माहिती पोलिासंना मिळाली आहे. यातील एक पाकिस्तानचा असून दोघे जण ट्रकच्या मागे तर अन्य दोघे ट्रकच्या समोर होते. हे लष्कर ए तोयबाचे दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या