जेएनपीटीने डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावावा – सरपंच दामूशेठ घरत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

जेएनपीटी प्रकल्प बाधित महालण विभागातील ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी केली आहे.

जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत यांनी माहिती देताना सांगितले की, उरण तालुक्यातील जसखार, सोनारी, करळ, नविन शेवा, हनूमान कोळीवाडा, फुंडे, नवघर, पागोटे, धुतूम, चिर्ले, जासई आदी ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पगस्ताच्या जमीनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या आहेत. परंतु येथील गावठाण विस्ताराचा, नागरी समस्यांचा, रोजगाराचा, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला हाक देत नुकताच जेएनपीटी प्रशासनाने बंदर परिसर, जेएनपीटी वसाहतीमध्ये स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अशा बंदरातील अधिकारी, कर्मचारी वर्गाचे येथील ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पगस्त नागरीक आभार व्यक्त करीत आहेत. परंतु बंदर प्रशासनाने स्वच्छता अभियानातील गोळा करण्यात आलेला केर कचरा प्रकल्पबाधित ग्रामपंचायत परीसरात टाकल्याने त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

त्यात जेएनपीटी प्रकल्प बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी सिडको व जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने गेली २५ वर्ष पुढाकार न घेतल्याने या ग्रामपंचायत हद्दीतील केर कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न येथील ग्रामपंचायतीना सतावीत आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने बंदरातील वसाहतीतील आणि जेएनपीटीबाधित ग्रामपंचायतींना सतावणारा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी लावून धरली आहे.

नाही तर वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे येथील ग्रामपंचायत परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती ही सरपंच दामूशेठ घरत यांनी व्यक्त केली आहे.