
उरणच्या ओएनजीसीमध्ये आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याने तालुक्यातील अग्निशमन यंत्रणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जेएनपीटीच्या हॉस्पिटल अग्निशमन पंप हाऊसमधील 25 हजार लिटरची टाकी फुटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. रात्रपाळीत काम करणारे दोन कामगार बचावले आहेत. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे टाकी फुटली आणि टाकीतील पाणी पंप हाऊसमध्ये पसरले. पाण्याच्या दाबामुळे पंप हाऊसची भिंतही वाहून गेली. सुदैवाने पम्प हाऊसमधला वीज प्रवाह या पाण्यामध्ये उतरला नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
जेएनपीटी हॉस्पीटलमधल्या अग्निशमन यंत्रणेसाठी हॉस्पिटलच्या बाजूलाच पंप हाऊस बनविले आहे. या पम्प हाऊसमध्ये पाण्यासाठी 25 हजार लिटरच्या चार प्लास्टिकच्या टाक्या बसविल्या आहेत. रात्री त्यापैकी एक टाकी फुटली तर दुसऱ्या टाकीला गळती लागली आहे. निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या टाक्या असल्याने त्या फुटल्याचे कामगारांनी सांगितले. येथील अग्निशमन यंत्रणेसाठी जेएनपीटीने साडेचार कोटी रूपयांचा खर्च केला आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे झाल्याचे सांगण्यात आहे. अग्निशमन यंत्रणेसाठी वापरण्यात आलेले पाईप आणि त्याची वेल्डींगही निकृष्ट दर्जाची आहे. येथे फायर ब्रिगेडच्या कामगारांना प्राथमिक सोयी सुविधाही देण्यात येत नाहीत, असा आरोप येथे कामगारांनी केला आहे. तसेच या निकृष्ट कामामुळे भविष्यात हॉस्पिटलमध्ये आग लागल्यास धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या बाबत जेएनपीटीचे अग्निशमन विभागाचे मुख्य संजय सक्सेना यांच्याकडे विचारणा केली असता या घटनेमुळे चिंता करण्याचे कारण नाही. अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आम्ही सर्व चांगल्या प्रतिचे साहित्य वापरले आहे. येथील कामगारांना अग्निशमनाबाबत काही कळत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची नेहमी ओरड करत असतात. फुटलेल्या टाकीच्या ठिकाणी नवीन टाकी बसविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


























































