
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी मुखवटेधारी गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. रविवारी मध्यरात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे जमून ठिय्या आंदोलन केले. यावेळी मेणबत्त्या पेटवून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला गेला. पवई येथील आयआयटी मुंबईतही विद्यार्थ्यांनी जेएनयूतील हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शने केली.
मुंबईच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद आणि कुणाल कामरा यांचाही त्यात समावेश होता. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन जेएनयूतील हिंसाचाराचा निषेध केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी यांनीही या आंदोलनात हजेरी लावून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.
जेएनयूच्या साबरमती हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचे शांततेत आंदोलन सुरू असताना तिथे गुंडांनी घुसून हिंसाचार केला असे सांगतानाच ते गुंड आत घुसलेच कसे? हाणामारीचा प्रकार सुरू झाला तेव्हा पोलीस कुठे होते? असा सवालही रोहित पवार यांनी केला. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये गेली दीड महिने कुलगुरूच गायब आहेत. इंटरनेट सेवा बंद असल्याने हजारो विद्यार्थ्यांना सेमिस्टरचे अर्ज भरता आले नाहीत अशी अवस्था असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, जेएनयूतील हिंसाचार प्रकरणावरून कम्युनिस्ट समर्थक जेएनयू विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रुईया महाविद्यालयाबाहेर आंदोलन करत जेएनयूतील हिंसाचार कम्युनिस्ट गुंडांनी केल्याचा आरोप केला.
विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱया गुंडांवर कारवाई झालीच पाहिजे – आदित्य ठाकरे
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर गुंडांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेबद्दल देशभरात निषेध होत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. ‘जेएनयूमध्ये शांततेत आंदोलन करताना विद्यार्थ्यांना ज्या हिंसाचाराचा सामना करावा लागला ते अत्यंत क्रूर आणि चिंताजनक आहे. जमियामध्येही तेच झाले आणि जेएनयूमध्येही. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱया गुंडांवर कारवाई झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा.’ असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवर अभिनेत्री सोनम कपूर हिने ‘आम्हाला असाच नेता पाहिजे. आशेचा किरण अजूनही कायम आहे’ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पवई येथील आयआयटी मुंबई आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थांसह विविध महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन सुरू केले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या आंदोलनात हजेरी लावून पाठिंबा दर्शवला.
बॉलीवूडकरांकडूनही निषेध
बॉलीवूडमधील कलाकारांनीही वांद्रे येथील कार्टर रोड येथे एकत्र येऊन जेएनयू विद्यापीठातील मारहाणीचा निषेध केला. आंदोलनात अभिनेत्री दिया मिर्झा, तापसी पन्नू, गौहर खान, झोया अख्तर, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, राहुल बोस यांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
























































