जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कारवाई नको!

विद्यार्थी संघटनेची आक्रमक भूमिका

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी मंगळवारीही निदर्शने सुरूच ठेवली. फीवाढ पूर्णपणे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. तसेच निदर्शनकर्त्यांवर प्रशासकीय किंवा कायदेशीर यापैकी कोणतीही कारवाई करू नका, कोणताही विद्यार्थी एक रुपयाचाही दंड भरणार नाही, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थी संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्रालयापुढे मांडली आहे.

विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अईशे घोष यांनी याबाबत सांगितले की, आम्ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सहसचिव जी. सी. होसूर यांची भेट घेतली व निदर्शने करणाऱया विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे. सध्या विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे नोटिसा पाठवल्या जात आहेत. पण आमची निदर्शने फीच्या मुद्दय़ावरून सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी एक रुपयाचाही दंड भरणार नाहीत, असे घोष यांनी स्पष्ट केले.

सरकारला जुमानत नसतील, तर ते आमचे काय ऐकणार?

विद्यार्थी व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समेट घडवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पथक नेमले आहे. त्यातील प्रतिनिधींना भेटण्यास विद्यापीठाचे रजिस्ट्रार तयार नाहीत. जर ते सरकारला जुमानत नसतील तर आमचे म्हणणे काय ऐकून घेणार, असा सवाल घोष यांनी उपस्थित केला.

कारवाईवरून राज्यसभेत गदारोळ

पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून मंगळवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ माजला. मोदी सरकार आणि विद्यापीठ प्रशासन सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप विरोधकांनी केला. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काही लोक जेएनयूला शहरी नक्षलवादाचे केंद्र बनवू पाहत असल्याचा दावा केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या