इंग्लंड आणि श्रीलंका संघात मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या लढतीत यजमान संघाने पाहुण्या संघाचा 5 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात पहिल्या डावात शतकीय खेळी करत इतिहास घडवणारा यष्टीरक्षक खेळाडू जॅमी स्मिथला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला दुसऱ्या डावात 205 धावांची आवश्यकता होती. जो रूटने नाबाद 62 धावांची खेळी करत संघाला आरामात विजय मिळवून दिला. सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने ऐतिहासिक कारनामा केला आणि त्याने एकाचवेळी एलन बॉर्डर, राहुल द्रविड यांचा विक्रम मोडत क्रीडा जगतात खळबळ उडवली.
मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात जो रूटने 128 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. रूटचे हे कसोटी कारकिर्दीतील 64 वे अर्धशतक आहे. कसोटीत सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रूटने 144 कसोटीतील 263 डावात फलंदाजी करताना 64 अर्धशतक ठोकली आहेत.
श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकीय धाव घेताच रूटने कसोटीत सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत एलन बॉर्डर, राहुल द्रविड यांना मागे टाकले. एनल बॉर्डर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी 63 अर्धशतक आहेत. तर रिकी पॉण्टिंगच्या नावावर कसोटीत 62 अर्धशतकांची नोंद आहे. या यादीत टॉपवर अर्थातच सचिन तेंडुलकर याचे नाव असून त्याच्या नावावर 68 अर्धशतकांची नोंद आहे. दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलचे नाव आहे. त्याने कसोटीत 66 अर्धशतक ठोकली आहेत.
मॅनचेस्टर क्रिकेट मैदानावर जो रूटने आतापर्यंत 8 अर्धशतक ठोकलेले आहेत. त्याने ईयान बेल आणि डेनिस कॉमटॉन यांना मागे सोडले आहे. दोघांनी या मैदानावर प्रत्येकी 7 अर्धशतकं ठोकलेली आहेत. यासह इंग्लंडकडून चौथ्या डावात सर्वाधिकवेळा अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. रुटने कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावात खेळताना 10व्यांदा अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत माईक एथरटन (11) पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर एलिस्टर कूक (11) असून तिसऱ्या स्थानावर जोफ्री बायकॉट (10) आहे.