शिवसेना गुजराती समाजाच्या मागे भक्कमपणे उभी राहिली! जोगेश्वरी येथील मेळाव्यात गुजराती बांधवांनी व्यक्त केली कृतज्ञता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व जाती-धर्माचा आदर करणाऱ्य़ा शिवसेनेने गुजराती समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व दिले. चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, राजूल पटेल, संध्या दोशी अशी अनेक उदाहरणे आहेत की  ज्या माध्यमातून शिवसेनेने गुजराती समाजाला राजकीय संधी उपलब्ध करून दिली. 1993 ची दंगल असो की अन्य कोणताही प्रसंग शिवसेना कायम पाठीशी भक्कमपणे उभी राहिली, अशा शब्दांत गुजराती बांधवांनी जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आज शिवसेनेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेक गुजराती बांधवांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेशही केला.

शिवसेना राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या टॅगलाईनने शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी नवनीत हॉल, गुजराती समाज भवन, जोगेश्वरी येथे गुजराती समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मोठय़ा संख्येने गुजराती समाज बांधव उपस्थित होते.

या मेळाव्यात हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांना महापालिका निवडणुकीत शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नोटा बंदी, जीएसटीमुळे गुजराती बांधव त्रस्त आहे. त्यांचे उद्योगधंदे डबघाईला आले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे शांत, संयमी नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्याने राज्याचे अर्थचक्र फिरू लागले. ते उत्तम प्रकारे राज्याचा गाडा चालवत असून शिवसेना कायम गुजराती माणसाच्या पाठीशी उभी राहिली आहे. तेव्हा गुजराती माणसानेही शिवसेनेला साध द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी गुजरात संपर्कप्रमुख नगरसेविका राजूल पटेल यांनी गुजराती समाजातील माझ्यासारख्या सामान्य महिलेला शिवसेनेने मान सन्मान दिला. राजकारणात नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. याउलट बोरिवली व दहिसरमध्ये गुजराती बांधव मोठय़ा संख्येने असतानाही भाजपने त्यांना 2014, 2019मध्ये आमदारकीचे साधे तिकटही दिले नाही. तेव्हा आपले कोण हे समजून शिवसेना वाढविण्यासाठी गुजराती समाजानेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजूल पटेल यांनी केले.

शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनीही नगरसेवक म्हणून आपली तिसरी टर्म असल्याचे सांगत शिवसेनेमुळे प्रभाग समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्षपद मिळाल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. या मेळाव्याला नगरसेवक राजू पेडणेकर, राजेश दोशी, जयंतीभाई मोदी आदी उपस्थित होते.