
नामेबिया आणि झिम्बाब्वेमध्ये 15 जानेवारी 2026 पासून 19 वर्षांखालील खेळाडूंचा वर्ल्डकप सुरू होत आहे. या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानच्या तरुण खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा तरुण संघ मैदानात उतरला असून वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघातही एका हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूची वर्णी लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या आणि केरळशी नाळ असलेल्या जॉन जेम्स याला संघात स्थान मिळाले आहे.
जॉन जेम्स याचा जन्म 20 फेब्रुवारी 2007 रोजी पश्चिम बंगालच्या खरगपूर येथे झाला. जॉनच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले. त्याचा प्रवास फुटबॉलच्या मैदानातून सुरू होऊन क्रिकेटच्या खेळपट्टीपर्यंत पोहोचला. त्याचे पहिले प्रेम फुटबॉल होते, मात्र वयाच्या नवव्या वर्षी तो क्रिकेटकडे वळला. फुटबॉलमुळे लांब स्पेल टाकणे आणि मैदानात चपळ क्षेत्ररक्षण करणे शक्य झाल्याचेही जॉन मान्य करतो.
जॉन जेम्सच्या यशामागे त्याच्या पालकांचा मोठा वाटा आहे. त्याचे आई-वडील दोघेही रजिस्टर्ड नर्स असून कामातून वेळ काढून त्यांनी जॉनला क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी साथ दिली. जॉनला परवाना मिळण्याआधीपासून त्याचे पालक त्याला तासन्तास गाडीने सरावासाठी घेऊन जायचे. जॉन कमी धावांवर बाद व्हायचा तेव्हा त्याची आई त्याला मानसिक आधार द्यायची. फलंदाजीसोबत तो गोलंदाजीमध्येही सक्षम असून आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात त्याची अष्टपैलू म्हणून निवड झालेली आहे.
जॉनचा जन्म पश्चिम बंगालमधून खरगपूर येथील असला तरी त्याचे कुटुंबीय मुळचे केरळचे आहे. तो अवघ्या काही महिन्यांचा असताना त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. मात्र आजही तो प्रत्येक सुट्टीत हिंदुस्थानात आपल्या नातेवाईकांना भेटायला येतो. त्याला हिंदुस्थानी खाद्यपदार्थ विशेष आवडतात.
गेल्या वर्षी सिडनी कसोटीत त्याला डिंक्स बॉय म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघासोबत त्याने तीन दिवस घालवले आणि त्याचा त्याला फायदाही झाला. त्याचा आदर्श पॅट कमिन्स आहे. भविष्यात आपल्यालाही कमिन्स सारखा खेळाडू बनायचे असल्याचे तो बोलूनही दाखवतो.






























































