
जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, जो तुरुंगात जाईल तोच प्रामाणिक आहे, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
या पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यात केजरीवाल यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन, आप खासदार संजय सिह, टीएमसी खासदार साकेत गोखले, 4 PM न्यूजचे मुख्य संपादक संजय शर्मा यांच्या उपस्थित होते.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, “सर्वात आधी मी संजय राऊत यांचे हे पुस्तक लिहिण्यासाठी अभिनंदन करू इच्छितो. यात अनेक तथ्ये आहेत आणि हे अतिशय भावनिक पुस्तक देखील आहे. त्यामुळे ज्यांनी हे वाचले नसेल, त्यांनी ते नक्की वाचावे.ठ
केजरीवाल म्हणाले, “मी या मंचावर बसलेल्या महानुभावांइतका अनुभवी राजकारणी नाही, पण माझे मन आणि थोडीफार राजकीय समज मला सांगते की, कदाचित मोदीजी २०२६ पूर्ण करणार नाहीत. मोदी आणि अमित शाह आता जाणार आहेत, त्यांचे साम्राज्य संपणार आहे. जनतेमध्ये ते इतके अलोकप्रिय झाले आहेत की, हजारो-लाखो ट्रोल्स असूनही ते सोशल मीडियाचे नरेटिव्ह नियंत्रित करू शकत नाहीत. आज मोदीजींच्या पोस्टखाली तुम्ही कमेंट्स वाचल्या, तर एक काळ असा होता की, यांची यंत्रणा एकही नकारात्मक कमेंट दिसू देत नव्हती, आता मात्र त्यांना फक्त शिव्याच मिळतात. पूर्वी मोदीजींविरुद्ध मीम बनवला तरी जेल व्हायची, आता इतके मीम्स बनत आहेत की, ते कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार? संपूर्ण इकोसिस्टम आणि वातावरण बदलले आहे. त्यांची विश्वासार्हता आता पूर्णपणे संपली आहे. मग प्रश्न उरतो की ते निवडणूक कशी जिंकत आहेत? तर ती बेईमानीने जिंकली जात आहे.”
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “याचे जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. मी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो. मी जेलमध्ये जाण्यापूर्वी माझ्या मतदारसंघात ४८,००० मते होती, पण मी परत आलो तेव्हा ती ४२,००० उरली होती. यांनी मागून ३० टक्के मते कट केली. अशा प्रकारे बेईमानी करून, खोटी मते टाकून आणि ईव्हीएममध्ये फेरफार करून ते चोरून जिंकत आहेत. पण जेव्हा जनता उभी राहते, तेव्हा सर्वांना त्यांचे उत्तर मिळते. मला विश्वास आहे की जेव्हा देशाला या दोघांपासून मुक्ती मिळेल, तेव्हा या लढाईत आमचेही योगदान होते आणि आम्हीही जेलमध्ये गेलो होतो, याचे समाधान आम्हाला असेल. मला या गोष्टीचे दुःख होते की, जनतेने त्यांना तीनवेळा इतका मोठा जनादेश दिला. त्यांना हवे असते तर ते देशासाठी खूप काही करू शकले असते. १२ वर्षे कमी नसतात, सुवर्ण अक्षरात त्यांचे नाव लिहिले गेले असते, पण आता हा कालखंड काळ्या अक्षरात लिहिला जाईल. १२ वर्षात त्यांनी असा कोणता कुकर्म नाही जो केला नसेल.”
ते म्हणाले की, “भाजपने आता अशी व्यवस्था निर्माण केली आहे की, प्रामाणिक कोण आणि बेईमान कोण याची व्याख्या स्पष्ट झाली आहे. जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, आणि जो ईडीला न घाबरता तुरुंगात जाईल तो प्रामाणिक.”
‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही- संजय राऊत



























































