तरुणांमध्ये सांधेदुखीच्या समस्यांमध्ये वाढ, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

वृद्धांमध्ये सांधेदुखी हा एक सामान्य आजार आहे, परंतु आता ही समस्या तरुणांमध्ये सर्रास आढळत आहे. हल्ली तर 25 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांना सांध्याशी निगडित आजार होऊ लागले आहेत. हात, पाय, कंबरेखालील भाग, गुडघे किंवा मणक्यासारख्या शरीराच्या अनेक भागांमध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवते. सांध्यांमध्ये ताठरता येते, सांधे दुखू लागतात किंवा संवेदनशील होऊ लागतात. सांध्यांना झालेली दुखापत, स्नायूंचा अतिवापर, संधिवात, नैराश्य, चिंता, तणाव, लठ्ठपणा यामुळेदेखील सांधेदुखीचा धोका वाढू शकतो. नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, निरोगी वजन राखणे तसेच हॉट ॲंड कोल्ड थेरपी वापरणे यामुळे सांधेदुखी कमी होऊ शकते.

सांधेदुखीचे सामान्य कारण म्हणजे ऑस्टियोआर्थरायटिस, जे हाडांमधील संरक्षक उती, कूर्च्यावर दुष्परिणाम करते. सांधे दुखतात आणि कडक होतात. संधिवातामुळे सांध्यांना सूज येते आणि वेदना होतात. अनेकदा सांधे विकृत होतात (प्रामुख्याने बोटे आणि मनगट). गाउट ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होतात, ज्यामुळे तीव्र वेदना होऊन सूज येते. हे पायाच्या बोटांमध्ये दिसून येते.

आजकाल बरेच तरुण लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले दिसतात. त्यांना पुरेसे जीवनसत्त्व डी मिळत नाही यामुळे सांधेदुखीचा सामना करावा लागतो. आजच्या तरुणांमध्ये सांधेदुखीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे व्हिटॅमिन डी3 आणि व्हिटॅमिन बी12 ची कमतरता. यापैकी बहुतेक व्यक्तींमध्ये कॅल्शियम बऱ्याचदा कमी प्रमाणात आढळते. नियमित व्यायामाकरिताही शरीराला कॅल्शियम आवश्यक असते. व्हिटॅमिन डी3 आणि व्हिटॅमिन बी12 रक्त चाचण्या करुन घ्याव्यात. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

या आजाराबाबत चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील रिप्लेसमेंट सर्जन डॉ. राकेश नायर म्हणाले की, दर महिन्याला 25 ते 50 वर्षे वयोगटातील 4 ते 5 रुग्ण सांधेदुखीची समस्या घेऊन रुग्णालयात येतात. तरुणांमध्ये सांधेदुखीची समस्या अचानक वाढत आहे. मी गेल्या 2-3 महिन्यांत सांधेदुखीच्या समस्येने ग्रस्त 30 रुग्णांची तपासणी केली आहे. त्यात 60 टक्के महिला आणि 40 टक्के पुरुषांचा समावेश होता. हे सर्व रुग्ण 25 ते 40 वयोगटातील होते. बर्साइटिस (बर्सा सॅकची जळजळ), व्हायरल इन्फेक्शन, पुरळ किंवा ताप यासारख्या विविध कारणांमुळे सांधेदुखी उद्भवू शकते. हाड मोडणे किंवा मुरगळणे, टेंडिनाइटिस (टेंडन्सची जळजळ) आणि हायपोथायरॉईडीझम यासारख्या दुखापतीनंतरही काही वेळा सांधेदुखीला सुरुवात होते. याशिवाय काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेदेखील सांधेदुखी होते, अशी माहितीही चेंबूर येथील एसआरव्ही रुग्णालयाचे डॉ. रंजन बर्नवाल यांनी दिली.

उपचार काय कराल? 

सांधेदुखीच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी कमी कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन, जंक फूड, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा, दररोज व्यायाम करा आणि कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा, असा सल्ला डॉ. राकेश नायर देतात.

हॉट ॲंड कोल्ड थेरपीचा पर्याय निवडल्याने सांधेदुखी कमी होऊ शकते. उडी मारण्यासारख्या सांध्यावर अतिरिक्त ताण येण्यासारख्या कृती करू नका. हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून सांधेदुखीपासून आराम मिळेल, हे उपाय डॉ. बर्नवाल सांगितले आहेत.