गच्चीवरून पडून पत्रकाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गच्चीवरून पडून पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना आज गोरेगाव येथे घडली. आदर्श मिश्रा (49) असे त्यांचे नाव आहे. नेमका हा अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

आदर्श हे गोरेगावच्या त्रिमूर्ती सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते. वेळ मिळेल तसे ते गच्चीवर वॉकला जात असायचे. रविवारी सकाळी आदर्श हे गच्चीवर वॉकला गेले होते. ट्रक पॅण्ट, टी शर्ट, हातात रुमाल घेऊन आदर्श गच्चीत जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 10.30च्या सुमारास आदर्श खाली पडले. ते नेमके कसे पडले हे स्पष्ट झाले नाही. जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घडल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस इमारतीमधील अधिकाधिक सीसीटीव्हीची पाहणी करत असून ज्यावरून काही बाबींचा उलगडा होऊन नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदनानंतर आदर्श यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. घटनेपूर्वी आदर्श यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून विचारपूस केली होती. आदर्श हे ‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी ते ‘व्होकहार्ट फाऊंडेशन’मध्ये रुजू झाले होते.