
सामना प्रतिनिधी, मुंबई
लालबाग उड्डाण पुलाचे निकृष्ट काम करणाऱया सिम्प्लेक्स इफ्रा या कंपनीला मुंबई मेट्रोचे काम देण्यात येऊ नये यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराची कंपनी काळ्यायादीत नसल्याचा युक्तिवाद एमएमआरडीएतर्फे आज करण्यात आला. हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व याबाबतची याचिका निकाली काढली.
एमएमआरडीएने डी एन नगर ते मानखुर्द दरम्यान सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो 2 बीचे काम सिम्प्लेक्स इफ्रा याकंपनीला दिले आहे. सिम्प्लेक्स इफ्रा या कंपनीकडून लालबागच्या पूलाचे काम करण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने लालबागच्या उड्डाणपुलाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. मेट्रोचे कामही कंपनीकडून निकृष्ट पद्धतीने केले जाईल म्हणून सिम्प्लेक्स कंपनीला हे काम देण्यात येऊ नये यासाठी भगवानजी रयानी यांनी हायकोर्टात याचिका केली आहे.
या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. एखाद्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड केले असेल तर त्याला काम देता येत नाही शिवाय लालबाग पूलाच्या कामाच्या चौकशी बाबतची माहितीही अद्याप आलेली नाही त्यामुळे कंपनीच्या कामावर आक्षेप घेणे चुकीचे आहे असा युक्तिवाद एमएमआरडीतर्फे करण्यात आला हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिका निकाली काढली.
summary- judicial relief for simplex infra over metro 2 B project




























































