सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज केल्यास बँक खाते रिकामे होईल, एसबीआयचा इशारा

1359

मोबाईल फोन वापरणे आता इतके गरजेचे झाले आहे की थोडय़ा वेळासाठीही कुणी तो बाजूला ठेवत नाही. चार्जिंगची सोय दिसली की लोक विमानतळ, लोकल ट्रेन किंवा हॉटेलांमध्येही फोन बिनधास्तपणे चार्ज करायला ठेवतात. मात्र अशा सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग कराल तर फोन हॅक होण्याची शक्यता असून तुमचा पासवर्ड चोरीला जाऊन बँक खाते रिकामे होईल, असा इशारा स्टेट बँकेने मोबाईलधारकांना दिला आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबतची पोस्ट करताना म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करणार असाल तर आधी दोनवेळा विचार करा. अशा जागी तुमच्या फोनमध्ये मालवेअर पाठवून तो सहज हॅक करता येऊ शकतो. ‘ज्यूस जॅकिंग’द्वारे तुमच्या फोनमधील पासवर्ड आणि डेटा चोरून हॅकर तुमचे बँक खाते सहज रिकामे करू शकतो. यावर एसबीआयने उपायही सुचविले आहेत.

काय आहे ज्यूस जॅकिंग?

ज्यूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर अटॅकच आहे. यात चार्जिंग पोर्टमध्ये बेमालूमपणे एक विद्युत उपकरण बसविले जाते. त्या ठिकाणी चार्जिंगसाठी फोन लावताच या उपकरणाद्वारे हॅकर त्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतो. त्यामुळे त्या मोबाईलधारकाचा डेटा हॅकरला कधीही काढून घेता येणे शक्य होते.

काय कराल?

  • अनोळखी ठिकाणी फोन चार्ज करू नका.
  • नाइलाज असेल तर चार्जिंग सॉकेटमागे एखादे इलेक्ट्रिक सॉकेट तर नाही ना हे नीट पाहून घ्या.
  • शक्यतो स्वतःची चार्जिंग केबलच वापरा.
  • ओळखीच्या व्यक्तीकडूनच पोर्टेबल बॅटरी घ्या.
आपली प्रतिक्रिया द्या