
पश्चिम रेल्वेवर रविवार १२ एप्रिलला, सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लाॅक घेण्यात येईल. यावेळी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी १०:०० ते दुपारी १५:०० वाजेपर्यंत, अशा पाच तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येईल.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. याव्यतिरिक्त, या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर बोरीवली आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या काही सेवा हार्बर मार्गावरून केवळ गोरेगावपर्यंतच चालवल्या जातील. प्रभावित होणाऱ्या गाड्यांची सविस्तर यादी उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवरील स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध असेल.



























































