अरण्य वाचन…कान्हा

31

अनंत सोनवणे

कान्हाचं जंगल म्हणजे भारतभूमीच्या गळय़ातला पाचूचा रत्नहार आहे… हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे उत्तम वन व्यवस्थापनाचा आदर्श नमुना आहे….

मी जंगल भ्रमंती सुरू करून तब्बल चार वर्षे झाली होती. या चार वर्षांत मी महाराष्ट्रातली सगळी प्रमुख आणि महाराष्ट्राबाहेरचीही काही जंगलं भटकून आलो होतो. पण एकाही ठिकाणी मला वाघाचं दर्शन झालं नव्हतं. अख्खा वाघ सोडा त्याचं शेपूटही दिसलं नव्हतं. ‘टायगर लक’ माझ्यावर जणू रुसलंच होतं. अशा परिस्थितीत मी कान्हा वारी केली आणि अरण्यदेवता पावली. कान्हाच्या त्या सर्वांगसुंदर जंगलानं मला माझं पहिलंवहिलं व्याघ्रदर्शन घडवलं. तेसुद्धा अवघ्या दहा-पंधरा फुटांवरून. सकाळच्या कोवळय़ा उन्हात स्वतःच्या साम्राज्याच्या सीमांची पहारेदारी करत तो दमदार पावलं टाकत चालत होता. पूर्ण वाढ झालेला नर वाघ. त्याच्या त्या नजरबंदी करणाऱया दर्शनानं अंगावर उठलेला रोमांच मी आजही अनुभवतो!

माझ्यासारख्या इतरही लाखों वन्यजीवप्रेमींना कान्हाच्या जंगलानं असे अविस्मरणीय अनुभव दिलेत. रुडयार्ड किपलिंगनं इथल्या अद्भुत जंगलकथा त्याच्या जंगलाबुकात मांडल्यात. याच जंगलात डॉ. शेल्लरने वाघाचा अभ्यास केला. पूर्वी कान्हात गोंड आदिवासी राजाचं राज्य होतं. ते गोंडवन नावानं ओळखलं जायचं. 1933 साली या प्रदेशाला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. पुढे 1955 मध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यान निर्माण झालं, तर 1973 साली कान्हा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली. हे जंगल प्रामुख्यानं साल आणि बांबूचं मिश्र पानगळीचं जंगल आहे. बॉक्साईटच्या टेकडय़ा, हिरवीगर्द झाडी, गवताळ प्रदेश, झरे, तळी आणि अत्यंत संपन्न असं वन्यजीवन यांनी कान्हाचं हे ‘शोला’ जंगल समृद्ध आहे. साल, धावडा, सावर, ताम्हण, टेंभुर्णी, शिसव, ऐन, मोह, बीजा, पळस, अर्जुन, हळदू, कांचन, खैर इत्यादी वृक्षांनी हे जंगल बहरलेलं आहे.

jungle-25

वाघ हा अर्थातच कान्हाचा आत्मा. एकेकाळी या परिसरात हजारो वाघ होते. ब्रिटिश आणि संस्थानिकांच्या काळात ही व्याघ्रभूमी शिकारभूमी बनली. 1,111 वाघ मारल्याची फुशारकी मिरवणारे सरगुजा संस्थानचे महाराज आपण अकराशेवा वाघ कान्हात मारल्याचं सांगायचे. कान्हा अभयारण्य घोषित झाल्यावरही जंगलात आदिवासींची 25 गावं होती. त्यांची हजारो पाळीव जनावरं अभयारण्यात मोकाट चरायची. त्याचा प्रतिकूल परिणाम तृणभक्षी प्राण्यांवर आणि त्यामुळे वाघावरही झाला. गावांचं जंगलाबाहेर पुनर्वसन झाल्यानंतर व्याघ्रसंवर्धनाला वेग मिळाला. गवताळ प्रदेशावरचं अतिक्रमण थांबल्यानं इथल्या बाराशिंगा या वैशिष्टय़पूर्ण वन्यजिवाची संख्याही चांगली वाढली. 12 फाटे फुटलेली, 32 इंच लांबीची डौलदार शिंगं तोऱयात मिरवणारा बाराशिंगा हे कान्हाचं वैभव आहे. याव्यतिरिक्त बिबळय़ा, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रे, अस्वल, तरस, कोल्हे, रानमांजर, भेकर, नीलगाय, चितळ, चौसिंगा, सांबर, माकड इत्यादी प्राणीही इथं पाहायला मिळतात.

कान्हा व्याघ्र प्रकल्पात 300 हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. यात महाभृंगराज, टकाचोर, मोर, नीळकंठ, मोठा धनेश, नवरंग, राखी व रंगीत तित्तर, हरियाल, रातवा, पांढरपाठी व काळं गिधाड, श्यामा इत्यादी पक्ष्यांचा समावेश होतो. शिक्रा, सर्प गरुड, तिसा गरुड, शाहबाज, कापशी, शाही ससाणा, शृंगी घुबड, पिंगळा, मत्स्य घुबड हे शिकारी पक्षी कान्हात दिसतात. तसचं इथल्या पाणवठय़ांवर काळा शेराटी, झोळीवाला बलाक, कमलपक्षी, खंडय़ा, पाणकोंबडी, वारकरी, अडई बदक, बगळे, पाणकावळे इत्यादी जलपक्षी पाहायला मिळतात. हिवाळय़ात इथं अनेक स्थलांतरित पक्षी मुक्कामी असतात.

कान्हात घोरपड, अनेक प्रकारचे सरडे व पाली, अजगर, नाग, नन्नाटी, रुक्या, घोणस हे सरपटणारे प्राणी दिसू लागतात. फुलपाखरं आणि मुंग्यांचे तर इथं अनेक प्रकार पाहायला मिळतात. या साऱया कीडे-मुंग्या-किटकांपासून वाघांपर्यंत सर्व प्रकारच्या वन्यजिवांना कान्हानं त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळवून दिलाय.

‘लॅण्ड टायगर’ म्हणून ओळखलं जाणारं कान्हाचं जंगल म्हणजे हिंदभूमीच्या गळय़ातला पाचूचा रत्नहार आहे. हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे उत्तम वन व्यवस्थापनाचा आदर्श नमुना आहे. सर्वसामान्य वन्यजीवप्रेमींसाठी तर हा निव्वळ स्वर्ग आहे. पर्यावरणशास्त्र्ा, वन्य जीवशास्त्र्ा आणि वनस्पतीशास्त्र्ााच्या अभ्यासकांसाठी हे उत्तम अभ्यास केंद्र आहे. अडीच वर्षे कान्हात राहून वानरांचा अभ्यास करणारा जे. पॉल न्यूटन या प्राणिशास्त्र्ाज्ञाच्या मते ‘कान्हाची तुलनाच करायची तर टांझानियाच्या एन गोरोन – गोरो व सेरेनगटी नॅशनल पार्कशीच करावी लागेल. हिंदुस्थानसाठी अत्यंत अभिमानास्पद अशा या व्याघ्र प्रकल्पाची वारी जीवनात एकदाच नव्हे तर वारंवार करायला हवी.

कान्हा व्याघ्र प्रकल्प

प्रमुख आकर्षण…वाघ, बाराशिंगा

जिल्हा…बालाघाट, मांडला

राज्य…मध्य प्रदेश

क्षेत्रफळ…940 चौ. कि. मी.

निर्मिती…1973

जवळचे रेल्वे स्थानक…जबलपूर (160 कि. मी.)

जवळचे विमानतळ…जबलपूर (160 कि. मी.)

निवास व्यवस्था…अनेक खासगी हॉटेल्स व रिसॉर्टस्

सर्वाधिक योग्य हंगाम…फेब्रुवारी ते जून

सुट्टीचा काळ…1 जुलै ते 15 ऑक्टोबर, होळी

 

 

आपली प्रतिक्रिया द्या