लोकांना न्यायालयीन प्रक्रिया शिक्षा वाटते; सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

लोकांना न्यायालयीन प्रक्रिया शिक्षेसारखी वाटते. त्यांना फक्त निकाल हवा असतो. खटल्यांना लोकं कंटाळली आहेत. ही बाब आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे, असे परखड मत सरन्यायाधीश डॉ. धनजंय चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले.
तोडगा देणार नाही. चांगला निकाल देऊ, असे आम्ही सांगत असतो. पण लोकांना ते मान्य होत नाही असे सांगत सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले, एका विशिष्ट ध्येयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण भारताचे आहे. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाची वास्तू असली तरी येथील रजिस्ट्रीमध्ये देशभरातील अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संपूर्ण भारतातील वैविधतेचे प्रतिनिधित्व करतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त 29 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एका उंच व्यासपीठावर बसतात. हायकोर्ट किंवा जिल्हा न्यायालयात पक्षकार कोण आहे हे कळते. सर्वोच्च न्यायालयात तसे होत नाही. आमच्यासमोर वकील असतात. आम्ही ज्यांना न्याय देतो ते आमच्यासाठी अदृश्य असतात ही आमची मोठी कमतरता आहे, असे सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी सांगितले.

भगवान श्रीकृष्ण लोकअदालतचे जनक

भगवान श्रीकृष्णांनी आपल्या देशात पहिली लोकअदालत आयोजित केली होती. त्यानंतर कौरव आणि पांडवांमध्ये वाद झाला. वाद सोडवण्यासाठी लवादाचा वापर करणे ही आपली संस्कृती आहे, असे कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात आयोजित केलेल्या लोकअदालतमध्ये तब्बल एक हजार प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये दिवाणी खटल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती मंत्री मेघवाल यांनी दिली.