न्या. सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला

हिंदुस्थानचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. ऐतहासिक ठरलेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. सूर्य कांत यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला प्रथमच सहा देशांच्या सरन्याधीशांची उपस्थिती ऐतिहासिक ठरली.

शपथविधी झाल्यानंतर न्या. सूर्य कांत यांनी मोठी बहिण आणि भावाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह इतरांची भेट घेतली. रविवारी सेवानिवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची गळाभेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती राधाकृष्णन, पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश सूर्य कांत, माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले. न्या. सूर्य कांत यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 1927 पर्यंत राहणार आहे.

पहिल्याच दिवशी न्या. कांत यांनी 17 प्रकरणांची सुनावणी घेतली. ते न्या. जॉयमाला बागची आणि न्या. अतुल चांदूरकर यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष आहेत.

निवृत्त सरन्यायाधीशांची कृती ठरली लक्षवेधक

निवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथविधी सोहळ्यानंतर केलेली कृती लक्षवेधक ठरली आहे. समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांची अधिकृत शासकीय कार राष्ट्रपती भवनातच न्या. सूर्य कांत यांच्यासाठी ठेवून दिली. नव्या सरन्यायाधीशांसाठी त्यांचे अधिकृत वाहन तत्काळ वापरासाठी उपलब्ध असले पाहिजे, याची न्या. गवई यांनी काळजी घेतली. त्यानंतर ते पर्यायी वाहनाने राष्ट्रपती भवनातून परतले.