
कामदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवारपासून दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावर भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली. बेळगावची मानाची सासनकाठी जोतिबा उत्सव मूर्तीसह मंदिरात दाखल झाली. श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून पाणी, रस्ते, शौचालय, कचरा व्यवस्थापन, पार्किं आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात्रेदरम्यान सलग 15 पालखी सोहळे निघणार असून एकूण 20 तोफेच्या सलामी धडाडणार आहेत. सध्या डोंगरावर सासनकाठय़ा दाखल झाल्या असून चांगभलंचा गजर सुरू झाला आहे.




























































