#AYODHYAVERDICT एका मुसलमानामुळे जिंकली हिंदूंनी राम मंदिराची लढाई

8709

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. ही जागा प्रभू श्री रामाची म्हणजेच रामलल्लाचीच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले. या आदेशासोबतच इथे राम मंदीर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एका मुसलमान व्यक्तिमुळेच हिंदूंनी ही राम मंदिराची लढाई जिंकली आहे.

या व्यक्तिचं नाव आहे पद्मश्री के. के. मोहम्मद. भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्तर विभागाचे माजी संचालक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ असलेले मोहम्मद यांचं या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. मोहम्मद यांनीच बाबरी वादग्रस्त वास्तुखाली जमिनीत मंदिराचे अवशेष शोधून काढले होते. 1976 साली अयोध्येत बी. बी. लाल यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्वीय उत्खनन करण्यात आलं होतं. लाल यांच्या पथकाचे सहकारी म्हणून त्यांनीही या उत्खननात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी मोहम्मद यांनी अयोध्येत रामाचं अस्तित्व असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं, तरीही ते आपल्या विधानावर ठाम राहिले होते. शनिवारी झालेल्या अयोध्या निकालानंतर त्यांनी समाधानकारक निकाल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद हे असे पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी आजवर हिंदुस्थानातील अनेक पुरातन मंदिरे शोधण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. त्यांनी आपला हा प्रवास ‘मैं भारतीय हूँ’ या पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. त्यातही त्यांनी राम जन्मभूमीविषयी 1976 साली झालेल्या उत्खननाचा उल्लेख केला आहे. उत्खननात सापडलेल्या अवशेषांमध्ये मंदिराचे स्तंभ, वास्तुकलेत शुभचिन्ह म्हणून घडवले जाणारे स्तंभातील कलश सापडल्याची नोंद त्यांनी आपल्या पुस्तकात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या