
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे आयोजित विसा ओसवाल समाज हॉलमध्ये रंगलेल्या तिसऱया महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत तेलंगणाच्या के. श्रीनिवासने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणला 9-20, 23-0, 25-4 असे पराभूत करत बाजी मारली.
आक्रमक खेळ, अचूक शॉट्स आणि जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱया श्रीनिवासने चॅलेंजर्स ट्रॉफीसह 1.50 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. उपविजेत्या अभिषेकला 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा महम्मद आरिफ विजयी ठरला, तर महाराष्ट्राचा चांद युसूफ शेख चौथ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले महाराष्ट्राचा अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्रणी. गेली 40 वर्षे एका करंगळीच्या जोरावर कॅरम खेळत असलेल्या या जिद्दी खेळाडूचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला.
या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राज्य कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार, अजित सावंत, धनंजय साठे, यतीन ठाकूर, प्रदीप भाटकर, केतन चिखले यांच्या उपस्थितीत पार पडला.

























































