18 व्या वर्षी काम्या कार्तिकेयनने दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून रचला इतिहास, नौदलाकडून स्तुतिसुमने

असं म्हणतात की, इच्छा तिथे मार्ग.. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचं उत्तम उदाहारण म्हणजे काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयनने धाडस आणि दृढनिश्चयाचे उत्तम परीमाण काम्याने संपूर्ण देशासमोर ठेवले आहे. आज अवघ्या हिंदुस्थानला काम्याचा अभिमान आहे. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्याने इतिहास घडवला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी तिने दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून देशाचे नाव अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

हिंदुस्थानी नौदलातील अधिकाऱ्यांची 18 वर्षीय मुलगी काम्या कार्तिकेयन हिने इतिहास रचला आहे. लहान वयात दक्षिण धुवापर्यंत स्किइंग करत पोहोचल्याचा तिने आगळा वेगळा विक्रम नोंदवला आहे. अशी करणारी ती हिंदुस्थानची पहिली आणि जगातली दुसरी सगळ्यात लहान महिला बनली आहे. तिच्या या विक्रमाबद्दल हिंदुस्थानच्या नौदलाने तिचे अभिनंदन केले आहे.

काम्या कार्तिकेयन ही एका नौदल अधिकाऱ्यांची मुलगी असून ती नौदल शाळेच्या एनसीएसची माजी विद्यार्थिनी आहे. काम्याने -30℃ कठिण वातावरण, कमी तापमान, जोरदार वाऱ्याचा सामना करत 89 डिग्री दक्षिणेकडून सुमारे 60 नॉटीकल मैल म्हणजेच 115 किमी अंतर पायी पार केले आहे. तिने 27 डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचून तिच्या मोहिमेदरम्यान साहित्याने भरलेली स्लेज ओढून एक विक्रम प्रस्थापित केला. हिंदुस्थानी नौदलाने म्हटले आहे की, “ही गिर्यारोहक प्रतिभावान एक्सप्लोरर्स. ग्रँड स्लॅम जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती बनण्याच्या मार्गावर आहे.

काम्याने जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर केली आहेत आणि नेपाळकडून माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी ती सर्वात तरुण हिंदुस्थानी आणि जगातील दुसरी सर्वात तरुण महिला ठरली होती.