कास पठार पर्यटन हंगाम रविवारपासून सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

साताऱ्यातील घाटमाथ्यावर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे कास पठारावरील फुलांचे गालिचे येत्या आठवडाभरात बहरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, येत्या 1 सप्टेंबरपासून कास पठार पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे.

युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज सोसायटीचा दर्जा मिळाल्यानंतर कास पठारावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दरवर्षी सुमारे ऑगस्टच्या पंधरवड्यानंतर कास पठारावर फुले दिसायला लागतात. जैवविविधतेने समृद्ध असलेले हे पठार हजारो फुलांनी बहरलेले असते. त्यामुळे हौशी छायाचित्रकार, पर्यटक पठार बघायला येतात. यावर्षी सप्टेंबरपासून पठाराचा हंगाम सुरू होतो आहे. यासंदर्भात वन विभागाने नुकतेच पर्यटकांचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे असावे, याची बैठक घेतली होती.

कास पठारावरील पावसाचा जोर अद्याप ओसरला नसल्याने फुले फुलायला सुरुवात झालेली नाही. पुढील आठवड्यात पाऊस कमी झाल्यावर फुले बहरतील आणि सप्टेंबरपासून दीड महिना फुलांनी आच्छादलेले पठार पर्यटकांना बघायला मिळेल. पर्यटकांचे व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. पठारावर दोन वर्षांपूर्वीपर्यंत सुट्टीच्या दिवशी 50 ते 60 हजार पर्यटक हजेरी लावत होते. क्षमतेपेक्षा अधिक संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे पठारावर ताण येत होता. तो कमी करण्यासाठी वन विभागाने पर्यटकांच्या प्रवेशावर बंधने घातली आहेत. सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जात आहे. तीन हजारपेक्षा जास्त पर्यटकांना सुट्टीच्या दिवशी प्रवेश मिळत नाही. आठवड्यातील इतर दिवशी पर्यटकांनी पठारावर यावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षीदेखील पर्यटकांची संख्या मर्यादितच राहणार आहे. पठारावर पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली असून पठारावर जाण्यासाठी बसचीही व्यवस्था केल्याचे वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यटकांकडील प्लॅस्टिकची कसून तपासणी होणार आहे. पठारावर यापूर्वीदेखील वन विभागाने पर्यटकांच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंधने आणली होती. यंदा बंदीच्या पार्श्वभूमीवर वनाधिकारी अधिक सजग राहून पर्यटकांवर कारवाई करणार आहेत. प्रवेशद्वाराजवळच पर्यटकांची तपसाणी होणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी सहलीला निघताना जवळ कमीत कमी प्लॅस्टिकच्या वस्तू बाळगाव्यात, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

पर्यटकांसाठी नवीन नियमावली
सुट्टीच्या दिवशी प्रति पर्यटक 100 रुपये पर्यावरण शुल्क असेल. सोमवार ते शुक्रवार प्रति पर्यटक 50 रुपये पर्यावरण शुल्क असणार आहे. फोटोग्राफीसाठी 100 रुपये उपद्रव शुल्क, तर 10 पर्यटकांसाठी एका तासासाठी 100 रुपयांत प्रशिक्षित गाइड उपलब्ध असणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार 10 ते 100 रुपयांपर्यंत वाहनतळ शुल्क आकारला जाईल. 12 वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी आणि 65 वर्षांपुढील ज्येष्ठांना शुल्क माफ असणार आहे. http://www.kas.ind.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.