बनावट कागदपत्रांआधारे कब्रस्तान हडपले; ८ जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैठणगेट सब्जी मंडी येथील वक्फ बोर्डात नोंद असलेली मशीद, बागवान जमात खाना आणि कब्रस्तान अशी एकूण कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांआधारे हडप करणाऱ्या आठ जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठणगेट सब्जी मंडी भागातील मशीद, बागवान जमातखाना तसेच त्याच्याशेजारी असलेल्या मोठ्या कब्रस्तानच्या जागेतील सिटी सव्र्हे क. १४०८९, १४१६९ आणि १४२०८ मधील जागेची वक्फ बोर्डात नोंद असताना हाजी नूर मोहंमद उस्मान यांच्या नातेवाइकांनी सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागेवर वक्फ बोर्डाची परवानगी न घेता हाजी मोहंमद यासीन हाजी मोहंमद उस्मान, मोहंमद युनूस, नियाज हाजी नूर मोहंमद, रियाज नूर मोहंमद, अयाज नूर मोहंमद, मोहंमद फारुख मोहंमद युनूस, अब्दुल रऊफ अब्दुल रहेमान चौधरी यांनी आखिव पत्रिकेवर नाव नोंदवून घेतले. पॅरीस ज्यूस सेंटरचे शेख मुसा शेख अब्दुल रहेमान यांनी जमातखाना आणि कब्रस्तान कमिटी तसेच मशिदीचे अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर त्यांना हा घोळ लक्षात आला. समाजाच्या नावे असलेल्या जमिनीवर खासगी व्यक्तीने नाव नोंदवून घेतल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी वक्फ बोर्डात तक्रारीही केल्या. मात्र, अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याने अध्यक्ष शेख मुसा यांनी बैठकीत ठराव घेऊन सदस्य मोहंमद गयास हयात बागवान यांना संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. यातील हाजी नूर मोहंमद उस्मान हे मरण पावलेले आहेत.