काळबादेवी चिराबाजार, दुसरी फणसवाडी अग्यारी गल्लीतील इमारतीची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला. जखमीवर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इमारतीची 5.7 फूट उंची व सुमारे 30 फूट लांबीची कंपाऊंडची भिंत शेजारच्या हाऊस गल्लीवर पडल्याने ढिगाऱयाखाली तीनजण अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र यात दोघांचा मृत्यू झाला. हे तिघेही शेजारी काम करणारे मजूर असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील रस्ता बंद करण्यात आला आहे. घटनेची चौकशी केली सुरू असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत विनयकुमार निषाद (30) आणि रामचंद्र सहानी (30) यांचा मृत्यू झाला, तर सॅनी कनोजिया (19) हा जखमी झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी या घटनेचा पंचनामा करून बिल्डर सेजल डेव्हलपरवर यांच्या वतीने काम करणाऱया कॉन्ट्रटरवर सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना मदतीला धावली
सदर या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक उपविभागप्रमुख संपत ठाकूर, मंगेश सावंत, शांताराम सुर्वे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांना योग्य ते सहकार्य केले.