कळंब तालुक्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, आमदार कैलास पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

 

 

कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने अतीवृष्टी व बाधीत क्षेत्राचा पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून काही गावातील ग्रामसमितीमधील कर्मचारी हे सोईस्कर पध्दतीने फक्त नदी काठचेच पंचानामे करण्याचे आदेश आहेत असा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे गावागावात पंचनामे बाबत शेतकरी आक्रमक झाला असून बाधीत क्षेत्रातील सरसकट पंचानामे करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली असून गैरसमज निर्माण करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्याला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन व इतर पिके चांगल्या पोसली होती. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल असे बळीराजाला वाटत होते. मात्र मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला आणि होत्याचे नव्हते झाले. मांजरा, वाशिरा व तेरणा नद्यांना पूर आला. नदीचे पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पाण्यात तरंगले असून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

तहसीलदार हेमंत ढोकले यांनी तालुक्यातील ईटकुर, कळंब, येरमाळा, मस्सा, मोहा, गोविंदपुर, शिराढोण, नायगांव या महसुल मंडळात अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरांमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करणे कामी ग्रामस्तरीय समिती यांना आदेशीत करण्यात येत आहे. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

कळंब तालुक्यातील इटकूर येथे तहसीलदार हेमंत ढोकले हे पाहणी करीता गेले असता तेथील शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांना चर्चा करताना बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या बाधित झालेल्या सोयाबीन चे पंचनामे करण्यात येत आहे. मात्र काही ग्रामस्तरीय समिती मधील काही कर्मचाऱ्यांनी सोईस्कर पध्दतीने फक्त नदी काठचे आदेश आहेत असा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रम आवस्थेत आहे. तालुक्यातील सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्यात येणार आहेत, असे कृषी अधिकारी भागवतराव सरडे यांनी सांगितले आहे.

 

कळंब तालुक्यातील महसुल मंडळात अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरांमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्यात येणार आहे.

हेमंत ढोकले (तहसीलदार, कळंब)

जोरदार झालेल्या पाऊसामुळे कळंब तालुक्यातील सर्व महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे सोयाबिन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत. बाधीत क्षेत्राचे पंचनामे करण्याचे कोणी टाकत असेल माझ्याशी संपर्क साधावा.

आमदार कैलास घाडगे पाटील