काळाराम मंदिरात ५०० विद्यार्थ्यांच्या निनादाने दुमदुमले ‘मनाचे श्लोक’; दासनवमीनिमित्त भक्तिमय सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalaram mandir nashik das navami manache shlok recitation by students

दासनवमीच्या पावन मुहूर्तावर प्रभू श्री रामचंद्र यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या काळाराम मंदिर परिसरात ५०० शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक ‘मनाचे श्लोक’ पठण केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्ती आणि शिस्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

गुणगौरव न्यास यांच्या वतीने आणि प्रकल्प प्रमुख मनीषा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते १० या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने आणि सुस्पष्ट उच्चारात समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांचे सादरीकरण केले. या पठणाचे नेतृत्व प्रियांका गर्गे यांनी केले.

प्रमुख उपस्थितांचा गौरव

या कार्यक्रमाला शैलेन्द्र राहळकर आणि विद्या गर्गे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. काळाराम संस्थानचे विश्वस्त श्री. शुभम मंत्री यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि भाविक नागरिक उपस्थित होते.

संस्कारक्षम पिढी घडवण्याचा मानस

कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘भावी पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत आणि अध्यात्मिक वारसा जपला जावा, यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

kalaram mandir nashik das navami manache shlok recitation by students