कलगी-तुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,[email protected]

कलगी तुरा, सवाल-जबाब महाराष्ट्राच्या लावणीतील एक रंजक प्रकार… कुठून झाला याचा उगम…?

राजकीय क्षेत्रात एकमेकांचे विरोधक परस्परांवर दुगाण्या झाडू लागले अथवा नवरा-बायको भांडू लागले तर ‘काय कलगी-तुरा रंगलाय’ असे म्हटले जाते. कलगी-तुरा रूढ अर्थाने सवाल-जवाब या सदरात मोडत असला तरी त्यात अध्यात्म दडलेले असते. संपूर्ण हिंदुस्थानात कलगी-तुऱयाची परंपरा असून जरी कूटप्रश्ने आणि त्याची उत्तरे असे कलगी-तुऱयाचे स्वरूप असले तरी त्यात अध्यात्माबरोबर रंजकता असते. तमाशा काय किंवा कलगी-तुरा काय या संकल्पना नित्याच्या व्यवहारात आपण निगेटिव्हिटीने घेतो, पण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत या दोन्ही परंपरांना आगळेवेगळे स्थान आहे. तमाशाचा जन्मच मुळात कलगी-तुऱयाच्या आध्यात्मिक शाहिरीतून झाला. महाराष्ट्रातील तमाशा आणि खडीगंमत, राजस्थानमधील तुर्रा-कलंगी, जयपुरी ख्याल, कुचामणी ख्याल, कश्मीरमधील भांड-पथेर, उत्तर प्रदेशची नौटंकी, छत्तीसगढचा नाचा, चंदेली, मध्य प्रदेशचे आणि उत्तर प्रदेशचे स्वांग, कर्नाटकातील बायलाट्टा, दोड्डाट्टा, सन्नाट्टा या सर्व लोकनाटय़ परंपरांच्या मुळाशी कलगी-तुऱयाची शाहिरी आहे. शिव आणि शक्तीचा झगडा, पुरुष आणि प्रकृतीचा झगडा, ब्रह्म आणि मायेचा झगडा अशी अनेक झगडा काव्ये कलगी-तुऱयात असतात.

कलगी आणि तुरा याचा अर्थ पागोटय़ात लावायचा एक अलंकार. कलगी हा शब्द तुर्की भाषेतला, तर तुरा अरबी भाषेतला आहे. हे दोन्ही शब्द पारसी भाषेत आढळतात. म्हणजे कलगी आणि तुरा यांचा प्रवास तुर्कीतून पारसीत आणि पारसीतून मराठीत झाल्याचे दिसून येते. आदिशक्ती ही शिवाच्या उत्पत्तीचे कारण आहे अशी कलगीवाल्यांची भूमिका असते, तर तुरा पक्ष शक्ती आणि शिव यांच्या संयोगाला प्राधान्य देतो. कलगी-तुऱयाच्या भेदिक शाहिरीबद्दल डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आपल्या ग्रंथात केलेल्या प्रतिपादनाचा तपशील भारतीय संस्कृती कोशात दिलेला आहे, तो असा – भेदिके रचणाढ़ऱया शाहिरांना अध्यात्माचे शब्द वा प्रत्यक्ष ज्ञान होते असे नव्हे, पण त्यांनी पुराणांचे श्रवण चांगल्या प्रकारे केले होते. त्यांना अध्यात्माचा परिचय होता तो पुराणांच्याच अनुषंगाने. ऐन उमेदीत शृंगारिक लावण्या रचणारे शाहीरही आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्मपर भेदिक कवनांकडे वळत. तमाशाच्या फडातही मध्यरात्रीपर्यंत शृंगाराची उधळपट्टी झाल्यावर उत्तररात्री अध्यात्माचा रंग थाटला जाई.

कलगी-तुढ़ऱयाच्या शाहिरीवर संभू-राजूच्या, तसेच हैबतीच्या रचनांचा फार मोठा प्रभाव आहे. कलगी-तुढ़ऱयाच्या शाहिरीला फड किंवा आखाडा म्हणतात. यासंदर्भात मत मांडताना ‘लोकरंगभूमी’ या ग्रंथात डॉ. प्रभाकर मांडे यांनी म्हटले आहे – ‘कलगी व तुरा या दोन्ही संज्ञा परकीय भाषेच्या असल्या तरी या संज्ञा स्वीकारून जी पदे रचली जातात त्यातील आध्यात्मिक आशय मांडण्याची परंपरा मात्र फार जुनी आहे. कवनांच्या रूपाने ते शास्त्रचर्चा करतात. ही करण्यासाठी त्यांनी आपली निराळी रंगभूमी विकसित केली. त्यालाच फड किंवा आखाडा असे म्हणतात. कूटरचनेच्या किंवा भेदिकांच्या स्वरूपांची ही कवने हावभावांसह म्हटली जातात. काही वेळा गद्यातून व संवादांतून त्यांचे स्पष्टीकरणही केले जाते. कलगी-तुढ़ऱयाचीही एक रंगभूमी महाराष्ट्रात परंपरेने चालत आली आहे.’

मूलतः या रंगभूमीचे स्वरूप आणि प्रयोजन अध्यात्मचर्चा करण्याचे त्याचप्रमाणे पौराणिक कथागीते गाण्याचे असले तरीही काळाच्या ओघात त्याला रंजनप्रधान रंगभूमीचे स्वरूप आले आहे. भेदिके गाताना शिव पक्ष कसा श्रेष्ठ आहे हे सांगणे किंवा शक्ती पक्षाचे श्रेष्ठत्व सांगणे ही भूमिका लोप पावून त्याऐवजी चमत्कृतिप्रधान रचना करणे, आध्यात्मिक रूपके न योजिता केवळ आपल्या विद्वतेचे, बहुश्रुततेचे व रचनाकौशल्याचे दर्शन घडविणे आणि त्यायोगे सामान्यजनांना प्रभावित करून त्यांचे मनोरंजन करणे असेच या रंगभूमीचे प्रयोजन झाले आहे.

कलगी-तुऱढ़याचा प्रारंभ डफ आणि तुणतुण्याच्या सलामीने होतो. त्यानंतर गणाला सुरुवात होते. गण जर कलगीवाल्या पक्षाने सुरू केला तर त्या गणात तुरेवाल्या पक्षाला प्रश्न विचारला जातो व तुरेवाला पक्ष गण सादर करून त्या प्रश्नाला उत्तर देतो. पुढे झाड आधी की फळ आधी, शक्ती आधी की शिव आधी, ब्रह्माची फोड, मायेचा बाजार, सगुण-निर्गुणाचा वाद, अहं-सोहं विचार, पाप-पुण्य परिपाक, कुंडलिनी विचार, गुरू-शिष्य अनुग्रह, गुरू-शिष्य संवाद, गुरू वंदन अशा अनेक विषयांवर प्रश्न-उत्तरे होतात. ही प्रश्नोत्तरे गाण्याच्या स्वरूपातील असून त्यानंतर रामायण, महाभारत आणि पुराण यातील एखादी कथा कलगीवाले आणि तुरेवाले लावतात आणि या कथेतही ते एकमेकांना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचे निरसन उत्तराद्वारे करतात. शेवटी भैरवीचे पद होते आणि रात्रभर चाललेला हा कलगी-तुरा दिवस उजाडताच पूर्ण होतो. कलगी-तुढ़ऱयाच्या शाहिरीतील कवी हैबती या कलगीवाल्या शाहिराचा एक गण असा –

नमिला देव गणपती शारदा शक्ती

आरंभीला वीर वेताळ बांदी तो तिन्ही ताळ

तेहतीस कोटी देव सकळ मारुती वीर

तो प्रबळ पुराणे गाती

नमिला देव गणपती शारदा शक्ती

दुसरा वीर नरहरी

दुष्ट पहा पिष्ट मारी तो वैरी

जळस्थळ पवणबांदी तो सारी

सकळ दुनियेचा देव तो भैरी

काळ या म्हणती

नमिला देव गणपती शारदा शक्ती

जीव शिव टाक बांधून

रंगणी रंग द्यावा करून

डफ ऐकतील साधुजन

तेथवर करावे बंधन तुझी ही वृत्ती

नमिला देव गणपती शारदा शक्ती

पठ्ठे बापूराव हे कलगीवाले शाहीर. त्यांनी शुभमंगल चरणी गण नाचला या गणाची रचना केली आणि त्यात प्रश्न केला, ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला कोणाप्रती’ त्यावर तुरेवाले शाहीर भाऊ फक्कड यांनी उत्तर दिले, ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रती’ अशा पद्धतीने गणापासून ते एखाद्या पौराणिक कथेपर्यंत शक्तीवाले आणि तुरेवाले यांचे सवाल-जवाब रात्रभर सुरू असतात. कराड येथे नागपंचमीच्या दिवशी श्रीयाळसेठचा मोठा महोत्सव असतो. या महोत्सवात रात्रभर सातारा, सांगली, कोल्हापूरकडचे कलगी आणि तुरेवाले शाहीर आपली कला सादर करतात. कोकणात रायगड, रत्नागिरी जिह्यात शक्ती-तुऱयाची मोठी परंपरा आहे. रावणंग, घाणेकर, भोसले अशी कलगी-तुऱयाची घराणी कोकणात असून सणासुदीला साहित्यसंघ, दामोदर हॉल येथे हमखास कलगी-तुऱयाचे सामने रंगतात.

कलगी-तुढ़ऱयाच्या शाहिरांनी आपला पारंपरिक गायनाचा वारसा सोडून पुढे रंजनप्रधान तमाशाची वाट धरली. ज्यांनी हा वारसा अद्यापपर्यंत सांभाळला, त्यांचा चरितार्थ या कलेवर चालणे सर्वथरू अशक्य झाले. लिंगायत कोष्टी समाजातील कलावंत प्रामुख्याने कलगी-तुढ़ऱयाची परंपरा सांभाळत होते, तरी अन्य समाजघटकांमध्येही कलगी-तुऱढ़याचे शाहीर होऊन गेले. हे संच कालांतराने पारंपरिक शाहिरांच्या रचनांऐवजी स्वतःच्या रचना सादर करू लागले. केवळ गण, गौळण व रामायण, महाभारत, पुराणातील कथांवर आधारित पदे यांच्यासोबत अन्य लौकिक गीतेही हे संच सादर करू लागले. एकूणच कलगी-तुढ़ऱयाची पारंपरिक शाहिरी लुप्त होण्याच्या मार्गावर असून या शाहिरीचा प्रेक्षकही दिवसेंदिवस कमी होत आहे. सादरीकरणाच्या नव्या रूपामुळे शक्ती-तुऱढ़याचे सामने रायगड आणि रत्नागिरी जिह्यात लोकप्रिय आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातील कलगी-तुऱढ़याची शाहिरी मात्र अवशेष रूपाने उरली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)