
कल्याणमधील एका नामांकित शाळेत प्रशासकीय अधिकारी असलेल्या विवेक माने यांच्या मृत्यूचे गूढ तब्बल दीड वर्षांनंतर उकलले आहे. माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी पोलिसांनी नोंद केली होती. मात्र माने यांच्या वडिलांनी दिलेल्या एका माहितीवरून पोलिसांनी तपास केला आणि खुनी चक्क माने यांच्या घरातच सापडला. माने यांच्या आत्महत्येला त्यांची शिक्षिका पत्नीच जबाबदार असल्याचे उघड झाले असून त्यासाठी तिने तिच्या भावाची मदतही घेतली. पोलिसांनी मोबाईलचा सीडीआर तपासला आणि या प्रकरणाचा छडा लागला. पोलिसांनी माने यांची शिक्षिका पत्नी नम्रता माने आणि तिचा भाऊ अक्षय मानोरे याला अटक केली.
नम्रताशी संबंधित काही आक्षेपार्ह छायाचित्रे माने यांना सापडली होती. विवेक माने आणि त्यांची पत्नी नम्रता यांची रोज भांडणे होत. दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये विवेक माने (४३) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी माने यांच्या वडिलांनी विवेकला मृत्यूपूर्वी पत्नीच्या माहेरहून धमक्या येत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रकरणाचा पाठपुरावा करत पोलिसांकडे जप्त मोबाईलच्या तपासणीबाबत चौकशी केली. यानंतर प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या मोबाईल सीडीआर अहवालात आक्षेपार्ह फोटो, संभाषण तसेच विवेकला पत्नीच्या नातेवाईकांकडून दिलेल्या धमक्यांचे कॉल रेकॉर्ड आढळून आले. व्हिसेरा तसेच संशयित आरोपींच्या मोबाईल टॉवर लोकेशनचा अहवाल अद्याप मिळायचा बाकी असल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडेकर सांगितले.































































